दोन गझला : किरणकुमार मडावी


 
 
१.
दुःखामधे कितीदा, येथे निभाव झाला..! 
म्हणुनीच आज माझा, हसरा स्वभाव झाला..! 

हृदयातुनी उसळती, लाव्ह्यासमान अश्रू,
नयनांवरी किती हा, मोठा दबाव झाला..! 

देहात मोहमाया, ईर्ष्याच नांदते जर,
अपुल्यात माणसाचा, नक्की अभाव झाला..! 

भटकी जमात माझी, घेते तपास आधी,
भेटेल ओल जेथे, तेथे पडाव झाला...! 

ते फोडतील येथे, आभाळ पिंजराही,
रानात पाखरांचा, जर का उठाव झाला..! 

२.

होकार काय देऊ, मी तुझ्या पावलांना..! 
आधार काय देऊ, मी तुझ्या पावलांना..! 

माझ्या समोर माझी, फाटकी झोपडी ही,
घरदार काय देऊ, मी तुझ्या पावलांना..! 

ही निर्विकार झाली, माणसे आज सारी,
आकार काय देऊ, मी तुझ्या पावलांना..! 

ना ओल माणसांना, ओल नाही ढगांना,
मल्हार काय देऊ, मी तुझ्या पावलांना..! 

पोटातल्या भुकेचा, सामना पत्थरांशी, 
शृंगार काय देऊ, मी तुझ्या पावलांना..! 
 
...................................................................

किरणकुमार मडावी,
यवतमाळ

     

1 comment:

  1. रानात पाखरांचा ...


    माझ्यासमोर माझी...

    अप्रतिम

    ReplyDelete