तीन गझला : गजानन दरोडे

 

१.

कोडगी करते मला तडजोड माझी 
जीवना इतक्यात चिंता सोड माझी 

तीन एक्क्यांचाच आहे डाव माझा 
आजही जग शोधताहे तोड माझी 

कोण येथे जिंकतो पाहू उपाशी 
आतड्यांशी लागलेली होड माझी 

तू तुला गझलेत माझ्या शोधते ना 
बघ वही, प्रत्येक खोडाखोड माझी

त्रास देणारा म्हणे ध्यानात असतो 
मानूनी घ्यावीत सेवा गोड माझी 

काळजाची ज्यास कळते ही बिमारी 
त्याच भोंदूने करावी फोड माझी 

 २.
                 
जशा तू फेकल्या शपथा 
हवेवर वाचल्या शपथा 

जळाली मायची भाकर 
चुलीवर थापल्या शपथा 

तिचा तर  स्टाॅक आहे ना 
जराश्या मागल्या शपथा 

असे हा उंबरा साक्षी 
कितीदा चावल्या शपथा 
 
जसा मी लागलो पाळू 
किती लाडावल्या शपथा 

दिवसभर गाजल्या, कारण 
सकाळी घेतल्या शपथा 

३.
 
सुईला भ्यायच्या जखमा
तरी उसवायच्या जखमा 

जसा का एकटा दिसलो 
मला घेरायच्या जखमा 

ठरवले आजपासुन मी
मजेने प्यायच्या जखमा 

तिला पैंजण म्हणू का मी 
मनी वाजायच्या जखमा 

गझल होऊन येते ती 
म्हणूनी गायच्या जखमा 

.............................................
 गजानन दरोडे 
 9960765776


2 comments: