तीन गझला : जयदीप जोशी

 

१.
किती लाचार आहे क्षण निरोपाचा
जवळ येणार आहे क्षण निरोपाचा

कुणाला अर्थ त्याचा लागला आहे
असा उद्गार आहे क्षण निरोपाचा

तुझे प्रतिबिंब गोळा लाल मातीचा
तुझा कुंभार आहे क्षण निरोपाचा

पुन्हा येईल का हातात ह्या अपयश
पुन्हा गर्भार आहे क्षण निरोपाचा

नफा नाही मला, नाही तुला तोटा
असा व्यवहार आहे क्षण निरोपाचा

कशाला कोंडले आहेस तू त्याला
कुठे जाणार आहे क्षण निरोपाचा


२.
जगावेगळे लिहून चालत नाही, पण मी लिहितो
मलाच माझे अक्षर लागत नाही, पण मी लिहितो

मनात माझ्या काही ठेवत नाही, बोलत नाही
दुःख जगाला माझे सांगत नाही, पण मी लिहितो

दुःख जगाला माझे सांगत नाही, पण मी लिहितो
मला कधी मी जाब विचारत नाही, पण मी लिहितो

वहीत लिहितो, वही कपाटामध्ये असते नंतर
कुणीच माझे लिखाण वाचत नाही, पण मी लिहितो

कुठे शमवली जाते आहे माझी भूक अशाने
तहान-ही शब्दांनी भागत नाही, पण मी लिहितो

दिसेल ते बघणारी दुनिया जे जे दिसेल बघते
कुणीच दुसरा अर्थ विचारत नाही, पण मी लिहितो


३.
 
हजारदा लिहून एक ओळ खोडली
तुझ्याकडे बघून एक ओळ खोडली

उगाच मी दिशा दिशा पुसून टाकल्या
चुकून मी चुकून एक ओळ खोडली

जसे सुचेल मी तसे लिहायला हवे
म्हणून मी अजून एक ओळ खोडली

मनातल्या मनात मी सुगंध ठेवला 
गुलाब वापरून एक ओळ खोडली

बराच वेळ घेतला निरोप द्यायला 
पुन्हा पुन्हा रडून एक ओळ खोडली
 
......................................

जयदीप जोशी
A2/502, अंथुरीयम, नीलकंठ ग्रीन्स,
बीहाईंड हॅपी वॅली, ठाणे(प) 400607

2 comments:

  1. तिन्ही गझला झकासच जयदीप!

    ReplyDelete
  2. निरोपाचा क्षण ...👌

    इतर दोन्हीही रचना सुंदर

    ReplyDelete