दीपोत्सवात रंग गझलेचा : साबीर सोलापूरी

 

                      
                     दिवाळी हा तिमिराकडून तेजाकडं नेणारा सण. म्हणूनच त्याला प्रकाशाचा उत्सव म्हटलं गेलंय. दारावर आकाश कंदिल टांगण्याचा. घरादारात पणत्यांच्या ओळी मांडण्याचा हा सण चैतन्याचं, मांगल्याचं प्रतीक. या सणाचं पावित्र्य, महत्त्व अनेक कवींनी कवितांमधून सांगितलंय. कित्येक मराठी चित्रपटगीतांतून गीतकारांनी दिवाळीची वेगवेगळी वैशिष्ट्यं शब्दांकित केलीय. याला मराठी गझलकारदेखील अपवाद नाहीय. गझलकारांनीही दिवाळीची निरनिराळी रूपं गझलांमधून, शेरांमधून चितारलीय. प्रत्येकांनी आपापला रंग दिवाळीत भरलाय्. अशा'रंग माझा वेगळा' म्हणणाऱ्या गझला रसिकमनाला खचितच भुरळ पाडणाऱ्या ठरतात. दिवाळी जशी सणांची सम्राज्ञी तशीच गझलही कवितांची सम्राज्ञी. ही एका अर्थानं प्रकाशाचीच पूजा.
                      मराठी गझलचे उस्ताद सुरेश भट उर्फ दादा यांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत सर्वार्थानं रुजवला,फुलवला. पूर्णवेळ गझलसेवा करणारे सुरेश भट यांचे रुपगंधा (१९६१) रंग माझा वेगळा (१९७४) एल्गार (१९८३) झंजावात (१९९४) सप्तरंग (२००२) रसवंतीचा मुजरा (२००७) हे गझल कवितासंग्रह प्रकाशित. भटसाहेब आज आपल्यात नसले तरी त्यांच्या गझलांचं गारुड तसूभरही ओसरलेलं नाहीयं. भावभावनांचा साज लेऊन त्यांची गझल ऐटीत पुढे जाते. तिला इथल्या अस्सल मातीचा सुगंध आहे. जीवनाचं सखोल, विशाल चिंतन त्यांनी केलंय् जे आर्त अनुभव घेतले व ज्या व्यथा-वेदना उरी घेऊन त्यांनी प्रतिभेची मशाल मिरविली त्याचं समग्रदर्शन' त्यांच्या गझलेत उमटलंय्. सुरेश भट अन् मराठी गझलांचं हे अव्दैत मराठी मनाला म्हणून मोहिनी घालणारं ठरलंय्. दिवाळीतील सुखाची लयलूट असो वा ओढगस्तीतील एकाकी दुःखाचा परिपाक असो. या दोन्ही भिन्नावस्था त्यांनी तितक्याच ताकदीनं अक्षरबद्ध केल्या. ही त्यांच्या गझलेची खरी कमाल. लोकसमूहाच्या आक्रोशाला, असंतोषाला ते नेहमीच उद्गार देत राहिले. वानखीदाखल त्यांचा शेर पाहा.
उपाशी लोकहो, आली दिवाळी राजपुत्रांची;
दिवे जाळून रक्ताचे,करा अंधार आनंदी!

                      राजाला दिवाळी माहीतच नसते. कारण त्याच्या घरी रोजच दिवाळी. तो रोजच तुपाशी खातो. जे लोक उपाशी. त्यांना खरं दिवाळीचं अप्रूप. परंतु दिवाळीसारख्या आनंदाच्या सणालाही त्यांची हातातोंडाची गाठ पडत नाहीयं. दररोजचा जीवन-मरणाचा लढा त्यांच्या समोर आ वासून उभा. दिवाळीच्या प्रकाशावरही जिथं राजपुत्र आपलं वर्चस्व राखून असतात तिथं गोरगरिबांच्या वाट्याला प्रकाश कसा येईल? अशा भुकेकंगालांना भटांचं सांगणं की, केवळ दैवाला दुषणं देत बसू नका. अंधारालाही आनंदी करा. त्यासाठी रक्ताचे दिवे जाळा. अंधारालाही ज्योत फुटेल हा दुर्दम्य आशावाद अफलातूनच.
                  दादांकडून प्रेरणा घेतलेले अनेक गझलकार मराठी सारस्वतांच्या प्रांगणात आज मुक्तपणे विहार करताना दिसून येतात. तेव्हा मराठी गझलांमधून दिवाळी कशी अवतरते ते आपण पाहणार आहोत. गझलेचा एकच विषय असू शकतो. किंवा एकाच गझलेतून वेगवेगळे विषय शेरांच्या रूपात अविष्कृत होऊ शकतात त्यालाच उर्दूत मुसलसल आणि गैरमुसलसल गझल म्हणतात. तद्वतच महाराष्ट्रातील काही नामवंत गझलकारांनी निरनिराळ्या बहरात (वृत्त-छंद) दिवाळी ही रदीफ (अंत्ययमक) घेऊन गझला लिहिल्या. तर काहींनी आपल्या गझलेतून एखाद-दुसरा शेर दिवाळीवर गुंफला. सुरेश भटानंतर अतिशय हरहुन्नरी बुजुर्ग गझलकार म्हणून कल्याणचे वा.न. सरदेसाई यांच्याकडं पाहिलं जातं.
                  माझी कविता (१९८४) आभाळपंख (२००१) चांदण्याची तोरणे (२००३) अंगाई ते गझल-रूबाई समग्र वा.न. सरदेसाई (२००९) इंद्रनील प्रकाशन मुंबई. हा त्यांचा ग्रंथऐवज. नाट्य काव्यातही हातखंडा असलेले सरदेसाई कैक प्रतिष्ठित साहित्य संस्थांच्या पुरस्कारांचे धनी. 'हृदयाचा उद् गार गझल' हा स्वतंत्र कार्यक्रमही ते करतात. वृत्त छंदावरील त्यांची पकड निर्विवाद. अष्टपैलू प्रतिभेचं देणं लाभलेला त्यांचासारखा कवी विरळाच.  विद्युल्लता वृत्त छंदातील एका गझलेच्या पाचव्या शेरात सरदेसाई दिवाळी विषयी म्हणतात.
आकाशकंदिलांची दीपावली पुरे;
हृदयात प्रेमझुंबर टांगायला हवे!
      
          आकाश कंदिलांची दीपावली तर आपण वर्षानुवर्षे नित्यनेमानं साजरी करतोच करतो तरीही आपण दिवसेंदिवस प्रेमाला पारके होत चाललोय. तेव्हा प्रत्येकांनी हृदयात प्रेमझुंबरही टांगायला हवं. 'आपो दीपो भव:' म्हणजेच स्वतःला प्रकाशमान केल्याखेरीज समाजाला उजेडाचं वैभव प्राप्त होत नाही. कुणाबद्दल मनात अढी ठेवून, वैरत्वाची भावना बाळगायची नाही. किंबहुना प्रत्येकाची जीवनवाट उजेडाची होण्यासाठी हृदयात 'प्रेमझुंबर' टांगून लख्खमनानं शुभेच्छा देत 'मी' पणाला, ईर्ष्येला फटाक्यासारखं उडवून देणे हीच खरी दिवाळीची शिकवण. हा आशय सरदेसाईंनी शेरातून मांडलाय्.
             दिवंगत कवी बदिऊज्जमा पारकर उर्फ खावर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील उर्दू अन् मराठीतील महत्त्वाचे गझलकार. सुफी परंपरा लाभलेले खावर व्यवसायानं शिक्षक. त्यांची उर्दूत नऊ पुस्तके प्रकाशित. 'महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक मूल्ये' हे त्यांचे पुस्तक रसिक अन् अभ्यासकांच्या कौतुकास पात्र. त्यांनी अनेक मराठी कवितांचेही उर्दूत अनुवाद करून मराठी कवितेला विस्तृत अवकाश देण्याचं काम केलं. माझिया गझला मराठी(१९८३) चार माझी अक्षरे (१९९८) हे त्यांचे दोन मराठी गझलसंग्रह प्रकाशित. त्यापैकी 'माझिया गझला' मराठी हा गझलसंग्रह लक्षवेधी. 'त्यात त्यांनी 'दिवाळी' ही रदीफ घेऊन 'त्यांची खरी दिवाळी' या शीर्षकाची संपूर्ण गझल लिहिली. यात शेवटच्या शेरात मक्त्यात (तखल्लुस) मध्ये उपनामाचा त्यांनी चपखल वापर केलाय्.

क्षाळून चित्त केली मी साजरी दिवाळी!
दरसालाहून यंदा झाली बरी दिवाळी!!

अन् त्यांचा मक्ता असा येतो.

सर्वत्र अंगणी हा काळोख दाटलेला;
येईल काय 'खावर' माझ्या घरी दिवाळी!

            मी माझे चित्त रद्दबातल ठरवून दिवाळी साजरी केली. त्यामुळे ही नेहमीपेक्षा या खेपेस बरी झाली असे सांगताच आज सभोवताली काळोख दाटून आलाय्. अशा काळोख्यास्थितीत माझ्या घरी दिवाळी येईल काय, असा प्रश्नही खावर उपस्थित करतात. खावरचा अर्थच मुळी सूर्य. ते आपल्या गझलांमधून सूर्यासारखेच शेवटपर्यंत तळपत राहिले.
      अकोल्याचे प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत हे आघाडीचे ज्येष्ठ गझलकार. १९७८ पासून ते आजतागायत सातत्यानं गझल लेखन करताहेत. १९८९ मध्ये श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाने त्यांचा 'गुलाल' हा गझलसंग्रह प्रकाशित केला. २००१ साली 'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला' व चार ओळी तुझ्यासाठी हा मुक्तकांचा संग्रह २००३ साली प्रकाशित झाला. २०१९ मध्ये कारुण्य माणसाला संतत्व दान देते हा गझलसंग्रह आणि गझलाई हा लेखसंग्रह प्रकाशित झाला. ९ जानेवारी २०११ रोजी मराठी गझललेखन करिता बांधण जनप्रतिष्ठान मुंबईचा जीवनगौरव पुरस्कार. १५ एप्रिल २०१४ ला यु. आर. एल. फाउंडेशनचा गझल गौरव पुरस्कार. तसेच विदर्भ साहित्य संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती पुरस्कार. राघू-मैना (१९८२ ), तू तिथे असावे (२०१९) या मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन करणाऱ्या प्रा. डॉ. राऊत यांच्या लेखनाची सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय दखल घेण्यात आलीय. राऊत हे शब्दसुरांची दौलत उरात जतन करणारे गझलकार. गझल हाच त्यांचा श्वास. थाट फकिरी. म्हणूनच दुःख पचवून टाकण्याची त्यात झिंग भरलेली. नियतीपेक्षाही सरस माणसाचा पुरुषार्थ. दैवासमोर जो मोडत नाही, हार खात नाही. तोच नव्यानं उभारी घेऊ शकतो. हार-जीत दुय्यमच. जगण्याला धैर्यानं भिडण्याची प्रेरणा त्यांच्या गझलांमधून मिळते. दिवाळीच्या अनुषंगानं कारुण्याची झालर लेऊन त्यांचा शेर पुढील प्रमाणे येतो.

फाटक्या पदरात बांधे गाठ लक्ष्मी;
लेक झुरते एक साध्या फुलझडीला!

      'दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' असं म्हटलं जातं परंतु ज्यांच्या जन्माचे वस्त्रच पार फाटून गेलेय् अशा दुर्दैवी जिवांना पदराला गाठ बांधून आला दिवस ढकलावा लागतो. मग त्यांच्या आयुष्यात आनंदाचे, उजेडाचे क्षण येणार कुठून? ज्या माउलीची लेक लाखमोलाच्या दिवाळीत साध्या फुलझडीला झुरत असेल तर त्या माउलीचं अंत:करण कोण समजून घेणार? समाजजीवनातील ही विषमता राऊतांना नेहमीच विदग्ध करत आलीय्.
      कोल्हापूरचे श्रीराम पचिंद्रे हे उत्तम गझलकार. 'सूर्यपंख' हा त्यांचा गीत-गझलसंग्रह १३ जानेवारी १९९९ मध्ये राजश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केला. त्याचबरोबर भ्रष्टासुराच्या कथा, शाहू (कादंबरी) आभाळाचे पंख निळे (काव्यसंग्रह) रंग मैफलीचा, सुरेश भटांची पत्रे (संपादित) ही त्यांची ग्रंथसंपदा. पचिंद्रे हे गीत, गझल, कविता, अभंग, लावणी, मुक्तछंद, आदी जवळपास सर्व काव्यप्रकारात सहजपणे मुशाफिरी करणारे कवी. पद्याप्रमाणे गद्यलेखनातही त्यांचा मोठा वावर. नोकरी सांभाळत त्यांनी विपुल लेखन केलं. हा त्यांचा गुणविशेष. 'सूर्यपंख' मध्ये त्यांची चित्त ही गझल आहे. त्यातील चौथा शेर त्यांनी दिवाळीवर असा लिहिलाय-
डोळसांची आंधळी दिवाळी;
दीप अंधारास हे ओवाळती!

      या शेरातील अंतरंग वास्तवाशी सोबत करणारं आहे. आजकाल डोळसांची दिवाळीच आंधळी झालीय्. डोळे असूनही त्यांना दिवाळीतील देदिप्यमान प्रकाश न्याहाळता नाही येत. त्यामुळे दिवाळीतील दिवे आता अंधारास ओवाळण्याचं काम करताहेत. समाजजीवनात आरपार पसरलेला घनघोर अंधार दूर करण्यासाठी आता दिव्यांनीच अंधारास ओवाळावं. ही कल्पना अनोखी.
       मधुसूदन नानिवडेकर हे कोकणातील देवगड, जिल्हा रत्नागिरी येथील गझलकार. 'चांदणे नदीपात्रात' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित. अग्रगण्य नियतकालिकांमधून त्यांच्या गझला प्रामुख्यानं प्रकाशित होताहेत. मुशायर्‍यांमधला त्यांचा सहभागही तोलामोलाचा. ते कविता लिहीत असले तरी त्यांची पहिली पसंती गझलेलाच. सुरेश भट, प्रा. अविनाश सांगोलेकर यांनी संपादित केलेल्या अन् पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनांन प्रकाशित केलेल्या काफला (आजची प्रातिनिधिक मराठी गझल २०११) या गझलसंग्रहात 'मागणी' शीर्षकाची त्यांची गझल आहे. तिसऱ्या शेरात नानिवडेकर म्हणतात की,
मी कधी केली न माझ्या वेदनांची रोषणाई;
मी दिवाळी सोसण्याची साजरी साधीच केली!

                  आजूबाजूस डोळे दिपवणारी रोषणाई अन् फटाक्यांचा धूमधडाका सुरू आहे. अशा माहोलातही गझलकाराच्या मनास उदासीनता चहुबाजूंनं घेरून टाकते. नानिवडेकर स्वतःच्या वेदनांचा बाजार मांडत नाहीत. वेदनांची रोषनाई करू इच्छित नाहीत. खरं पाहू जाता दिवाळी हा आनंदाचा उत्सव. दुर्दैवानं दिवाळीतील हा आनंद त्यांच्या जवळपासही नाही फटकत. फक्त परिस्थितीचे चटके सोसत राहणं हे त्यांच्या भाळी लिहिलेलं. गंमत अशी की रडत, कुढत न बसता या सोसण्याचीच गझलकार दिवाळी साजरी करतो. मग अशी दिवाळी साधेपणाचीच होणार यात संदेह कसला. नानिवडेकरांनी आशयसंपन्न गझलांनी बर्‍याचशा मैफली काबीज केल्यात. त्याचा मी साक्षीदार.
                    यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील कलीम खान हे चिंतनशील गझलकार. 'कलीमच्या कविता' हा त्यांचा कवितासंग्रह प्रगत प्रकाशनातर्फे ७ ऑगस्ट २००४ रोजी प्रकाशित झाला. व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या खान यांचं सामाजिक भान प्रखर. सर्वधर्मसमभाव हा त्यांच्या रचनांचा प्राण. मानवजातीला लगडलेल्या दुःखाची चिंता त्यांच्या कवितांमधून प्रकर्षाने दिसून येते. समस्त मानवांच्या उत्थानासाठी लिहिणं हा त्यांच्या लेखणीचा धर्म. माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात इथली संस्कृती भिनलीय. असं ते अभिमानानं सांगतात. 'चंद्रा घरी दिवाळी' या गजलेचा मुखडा मतला असा
चंद्रा घरी दिवाळी, ताऱ्यांघरी दिवाळी;
मी सूर्य, पण तरीही माझीच रात काळी!

                  इथून तिथून. वरखाली. सगळ्यांच्या घरी दिवाळीचा प्रकाश तेजाळतोय. मी सूर्य असलो तरी. माझी रातकाळी. परंतु याची खंत त्यांना अजिबात वाटत नाहीय. स्वतः अंधारात राहून दुसऱ्यांना प्रकाश वाटण्यात जीवनाची सार्थकता आहे असं त्यांना सूचित करायचंय्. तर 'अबोल प्रीती' या गझलेतील एका शेरात कलीम खान म्हणतात की,
अंधार जीव जाळी, माझी अशी दिवाळी;
घेऊन दीप हाती येशील का सणाला?

                  कोणतीही परिस्थिती कधीच एकसारखी कायम राहत नाहीय्. दुःख-सुख. ऊन-सावली. अंधार-प्रकाश. ही निरंतर चालणारी प्रक्रिया. स्थित्यंतरं घडत राहतात. पानगळीनंतर पालवी फुटते. जेव्हा अंधारच जिवावर उठतो तेव्हा मात्र गझलकार दुसऱ्यांना हाती दीप घेऊन येण्याची साद घालतो. वरील दोन्ही शेरातून विसंगती प्रकट होत असली तरी गझलकार हा अंतिमतः प्रकाशाचीच पूजा बांधायला बांधील असल्याचं स्पष्ट होतोय्. जीवनानुभूतीतील विसंगती, विरोधाभास टिपण्यातच 'गझलियत'. असं जे म्हटलं जातं. ती हीच.
                  बुजुर्ग शायर कै. घन:श्याम धेंडे हे मूळचे पारगावचे. पुण्यात त्यांचं वास्तव्य होतं. गावी घरचा तमाशा फड असल्याकारणानं ते सुरुवातीस लावण्याच लिहीत असत. परंतु पुढं जेव्हा गझलेची राजधानी असलेल्या पुण्यात त्यांची गझलेशी जान-पहचान झाली तेव्हा ते गझलेच्या प्रेमात पडले. मग शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी गझलेचा हात सोडला नाही. किंवा गझलेने त्यांना सोडलं नाही. १४ जानेवारी १९९९ रोजी मानसन्मान प्रकाशन'तर्फे त्यांचा 'बासरी' हा मराठी गझलांचा संग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या बहुतांशी गझला व्यंग अन् उपहासाच्या अंगानं जाणाऱ्या. सामाजिक विषमतेवर प्रहार करणाऱ्या. तिरकसपणा हा त्यांच्या गझलांचा स्थायीभाव. त्यांच्या गझला मैफलीत लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत. 'धर्म' या शीर्षकाची यांची एक गझल. त्यातील त्यांचा एक शेर पाहा.
कशी दिवाळी यावी तेथे;
सदैव जेथे होळी आहे!

      जिथं दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. बारमाही खाण्या-पिण्याची बोंबाबोंब. तिथं दिवाळीसारख्या झगमगाटाच्या सणाला देखील होळीच साजरी करावी लागते. एकुणातच स्थिती मोठी विदारक. असं वाटायला लावणारं वास्तव धेंडे यांनी शेरातून समोर ठेवलंय्. जे आपल्याला अंतर्मुख करतं.
      २००४ मध्ये प्रकाशित झालेल्या 'गझल अभिव्यक्ती' दिवाळी अंकात प्रा. सतीश देवपूरकर यांची बिनशीर्षकाची गझल वाचनात आली त्यातील चौथा शेर दिवाळीवर असा येतो.
संपला चार दिवसांनी दीपोत्सव आयुष्याचा;
मग एका काळोखाने जन्माची सोबत केली!
      
                      मुळात माणूस उजेडप्रिय. उजेड हे सुखाचं प्रतीक. माणसाला आदिमकाळापासून उजेडाची ओढ लागून राहिलीय्. माणूस दिव्यांचा उत्सव साजरा करतो तो यासाठीच. दिवाळी म्हणजे तरी काय असते. प्रकाशाची पूजा बांधण्याचेच ते पर्व. चार दिवस का होईना दिवाळीच्या निमित्तानं सर्वत्र उजेडाचा हर्षोल्हास थाटलेला असतो. मात्र नाहीरे वर्गाला परिस्थितीच्या काळोखाचीच सोबत असते. हा अर्थ देवपूरकरांनी वरील शेरातून प्रवाहित केलाय्. याला आंतरिक व्यथेची छटा लाभलीय. 
      'दिवाळी' हा एकच विषय असला तरी प्रत्येक गझलकाराची मांडणी वेगळी. धाटणी निराळी. तरीही प्रत्येकानं गहिऱ्या काळोखाची वाट धुंडाळण्याचा प्रयत्न केलाय्. त्यामुळे बहुतांशी गझलकारांच्या दिवाळीला दुःखाची किनार आहे. याची इथं प्रचिती येते. सरतेशेवटी हेच खरं की ज्याचं जसं जगणं तशी त्याची दिवाळी. आपली निष्ठा शाबूत ठेवून लिहित राहणं महत्त्वाचं. प्रत्येकाची दिवाळी प्रफुल्ल प्रकाशात उजळून निघो हीच शुभेच्छा.
......................................... 
बदीऊज्जमा बिराजदार,
(साबिर सोलापुरी),
15, प्रियदर्शनी हौसिंग सोसायटी,
कुमठा नाका, सोलापूर:  ४१३००३.
भ्रमणध्वनी : ०९८९०१७१७०३
मेल : sabirsolapuri@gmail.com

1 comment: