चार गझला : अनंत नांदूरकर ' खलिश '



१.
विठ्ठलाला त्रास  का आहे कमी
आणि माझे दु:ख छोटी बातमी

दोन माझे हात माझे शस्त्र अन
श्वास  ही  घेतोच  आहे  नेहमी

आरश्यांच्या बांधुनी भिंती म्हणे
व्यापल्या दाही दिशा या मीच मी

लाजतो  सरडा  तुझ्या   रंगापुढे
बोलणे   ही  खूप  आहे मौसमी

एक   शंका  सारखी   शंकावते
एक फेरी  मारतो  मग  आत मी

थांबले   होते  जरा   झेपावणे
कापले मग   मीच  धागे  रेशमी

टाळतो मी काळजाला या जरी
नाडल्या जातो तरी हमखास मी

मी   भटांचा वारसा  ही  मानतो
वाचतो  आणिक अहेमद  क़ासमी

२.
जसे आभाळ कोसळते सश्यावर पानही पडता
तश्या संवेदना झाल्या कुणी काही जरा म्हणता

वसंताच्या शिगेला पोचता झाली सुरू चर्चा
फुलांच्या मांडल्या जाती सुगन्धाचा पदर ढळता

उशाला घेउनी निजतो फुलांचे स्वप्न मी कवळे
पुन्हा काट्यात तडफडतो दिवस कोणी नवा निघता

तुझ्या शिवराळ भाषेला असूया वाटते कारण
दिवा ज्यादाच फडफडतो कदाचित शेवटी विझता

मला बोलायचे म्हणजे मला बोलायचे असते
तुला भांडायचे असते विनाकारण गरज नसता

कशाला पेरतो भवताल तू काळोख हा माझ्या
तसा ही मी कधी उघडून डोळे चालतो रस्ता

सुगंधी शेर दरवळतो खरी असता ग़ज़लनिष्ठा
फकीरी जाणिवा समृद्ध करते पारदर्शकता

३.
मीच खरा अन माझी असली 
या गर्वातच चाके धसली

रोजच फोड़ी खोटा टाहो
एकेदिवशी खरेच डसली

करु द्या बड़बड़ भाग सवयिचा
कुणास कसली कुणास कसली

एक चेहरा पुन्हा हासला
जुनी ज़ख़म पुंन्हा ठसठसली

नजरेने होकार दिलेला
गोष्टीने पण गोष्ट बिनसली

नऊ दिवस नवलाचे सरले
दसव्या पासुन असली तसली

कधीतरी शिवलेला काऊ
तेंव्हा पासुन मैना बसली

अंगणात येईतो विझली
माजघरातुन जी खसखसली

मुक्त बहरली जी रानातुन
वेल तीच फुलली रसरसली

४.
 
गरजत्या सागराची गाज होतो
कधी मीही खुला आवाज होतो

तुझे गाणे तुझे होते जरीही
तरी मी संगतीला साज होतो

कुळाचा दाखला पुसला न कोणी
स्वत्: मी बोलणारा बाज होतो

अता मी हा कसा झालो कळेना
कधी मी केवढा निर्व्याज होतो

मला ठाऊक होते सर्व काही
तरी मी जन्मभर अंदाज होतो

मनाला केवढा तू गर्व होती
तुझा ही केवढा मी नाज होतो

मला ही सांधले होते कधी तू
कधी मी ही तुझा कोलाज होतो
..….............................................
 
अनंत नांदूरकर 'खलिश'
नागपूर

1 comment:

  1. चारही रचना छानच.

    मी भटांचा वारसाही मानतो...👌🌹

    मीच खरा अन माझी असली...
    सध्याच्या वास्तवतेवर परखड भाष्य

    कधी मीही तुझा कोलाज होतो...

    क्या बात है

    ReplyDelete