दोन गझला : पवन नालट



१.
पंख झडल्या पाखरांना सावरूया
विश्व प्रेमाने जरा हाती धरूया

प्रश्न आहे जर सुगंधी अत्तराचा
मग मनाचेही जरा अत्तर करूया.

पापणी होवू कुणाच्या वेदनेची
अन् कुणाच्या आसवांमध्ये झरूया.

भोगला आनंद सा-या जिंकण्याचा
एकदा आनंद देण्याही हरूया.

नेहमी हातांमधे काठ्या कशाला 
एकमेकांच्या चला जखमा भरूया...
 

२.       

जीव जातो पाखराचा आरशावर
पावले ठेवू नको तू पावलावर..

प्रेम करणारे असे कोणीच नाही
प्रेम करतो मी रिकाम्या कागदावर

अक्षरांना कोरतो नाही असे हो
अक्षरांना जोडतो मी काळजावर

काळजीने ठेवले ओझे असे की
श्वासही करती उधारी कातळावर

वाट मोडावी कुणाच्या वाटण्याची
वाटणी व्हावी कुणाच्या वाटण्यावर

भव्यता पाहून सारे थक्क आहे
अन् कुणाची खोल दृष्टी छाटण्यावर

जेवढी होते परीक्षा वादळाची
तेवढे आरोप होती वादळावर

वाट भागवते तृषा बघ चांदण्यांची
आंधळा करतो भरोसा माणसावर

छाटल्या गेलो तरी दगडाप्रमाणे
केवढा विश्वास माझ्या बाटण्यावर......

...................................................................

पवन नालट,
अमरावती

1 comment: