काही लोकांनी आपल्या समकालीन जगाविषयी एक समज पक्का करून घेतलेला असतो. तो जसा त्यांच्या दृष्टीने सत्याधारित असू शकतो, तसा इतरांच्या दृष्टीने 'अपसमज'ही असू शकतो. मराठी गझलच्या कपाळीही हे सर्व आले आहे. कसे ते आपण बघू: बहुतांशी मराठी कविता नवकाव्याच्या म्हणजे केशवसुत-मर्ढेकरी-ग्रेस पठडीतून सुटून जसजशी मुक्त काव्याच्या अंगाने जाऊ लागली, तसतशी ती काही अंशी उगीचच वैचारिकतेआडून पाखंडी 'मोकाट'पणा करीत सुटली. त्याकाळात संपूर्ण कवितेशी प्रामाणिक असलेला एक कवी- सुरेश भट दोन-दोन ओळींद्वारे देशी शैलीतून लोकभाषेतील शब्दांनी खोल आशय विशेषत: पीडितांच्या बाजूने कधी मिश्कीलतेने तर कधी स्वाभाविक संतापाने मांडू लागला. त्यांच्या काव्यात शृंगारासह मधेच एक वेदना आणि विश्वकल्याणाची प्रार्थनाही उमटताना दिसत होती. वृत्तांची बहुविधता आणि आशयवैविध्य ह्या वैशिष्ट्यांमुळे 'संपूर्ण कवितेशी प्रामाणिक' असे विशेषण आलेले आहे. ह्या दोन-दोन ओळींच्या जोड्या भिन्न-भिन्न यमकांनी लिहिण्याऐवजी केवळ पहिली जोडी सोडून पुढील जोड्या एकेकाच पण समान यमकांनी लिहिल्या की तिला गझल म्हणतात. अशा जुजबी परिचयासह थोडी अधिक आवश्यक माहिती आणि काही उदाहरणे देऊन त्यांना स्नेह्यांनी गझल लिहिण्यास प्रवृत्त केले. अशी भटसाहेब स्वत:च्या कविता लेखनाविषयी सांगतात. त्यामुळे सुरेश भटांनी मुख्यत: गझलेच्या अंगाने काव्यलेखन केले. पण तत्कालीन काही लोकांनी गझललेखनाला अपसमजातून कारकुनी, नक्षीकाम अशा शेलक्या शब्दांनी हिणवले. तर काही लोकांनी समजून-उमजून तरुण पोरांना नादी लावणे, वाया घालविणे अशी दुषणे दिलीत. बरे, साधना म्हणाल तर उच्चशिक्षित लोक तरी आपल्या विविध विवशतांपोटी आणि प्रमाणपत्रासाठी आवश्यक तेवढ्या 'क्यारीकुलम'ची 'पारायणे' करतात. पण भटांनी तर पौराणिक ग्रंथ, मध्ययुगीन गाथा-ग्रंथ, उर्दूच्या कवींचे काव्य, हे शब्दांच्या आशयसंगतीचा सर्वांगीण विचार करून वाचलेत, ध्वनिमुद्रिका ऐकल्यात. एवढेच नव्हे तर नोंदी घेण्यास उपयुक्त असे इंग्रजी उतारे त्यांनी संकलित केलेले होते. उदा. अभिव्यक्तीच्या संवेदनेच्या संदर्भात आंग्ल कवी आर. 'डब्ल्यू. गिब्दर'च्या कवितेचा ते आवर्जून उल्लेख करीत असत.
काही लोकांनी सुरेश भटांचे असे दुरूनही निरीक्षण-चिंतन करून गझल समजून घेतली तर काही लोकांनी विशेषत: नागपूरच्या जवळपास असणाऱ्यांनी सुरेशभटांच्या सान्निध्याचाही लाभ घेतला. अर्थात, केवळ वरवरच्या आकर्षणातून गझल काय, कशातच सातत्य राहत नसते. त्यामुळे 'काफल्या'तील मोजके लोक वगळता अन्य मंडळी पुढे फार काळ टिकली नाही. पण स्वभावत: स्वत:ची गझल लिहिणारे लोक पुढेही ती लिहित राहिलेत. विशेषत: त्याकाळात म्हणजे ऐंशीच्या दशकात, समजून-उमजून गझलपासून स्वत:ला दूर ठेवणारी मंडळीही होती. त्याला कारण कदाचित आपल्यावर 'कारकुनी'चा किंवा भटांच्या 'वर्कशॉप'मधील 'एप्रेंटीशीप' करणारा असा शिक्का बसू नये हे दडपणही असू शकते. आपपरभावाच्या वर उठून बघाल तर मला वाटते गझल लिहिण्यातील सातत्य ठेवण्यापेक्षाही स्वत:च्या जाणीवेतून गझलपासून दूर जाणे किंवा आधीपासूनच तिच्यापासून अंतर ठेवण्यासाठीही अधिक प्रगल्भतेची आवश्यकता असते. असे माझे प्रामाणिक मत आहे.
काही लोकांनी सुरेश भटांचे असे दुरूनही निरीक्षण-चिंतन करून गझल समजून घेतली तर काही लोकांनी विशेषत: नागपूरच्या जवळपास असणाऱ्यांनी सुरेशभटांच्या सान्निध्याचाही लाभ घेतला. अर्थात, केवळ वरवरच्या आकर्षणातून गझल काय, कशातच सातत्य राहत नसते. त्यामुळे 'काफल्या'तील मोजके लोक वगळता अन्य मंडळी पुढे फार काळ टिकली नाही. पण स्वभावत: स्वत:ची गझल लिहिणारे लोक पुढेही ती लिहित राहिलेत. विशेषत: त्याकाळात म्हणजे ऐंशीच्या दशकात, समजून-उमजून गझलपासून स्वत:ला दूर ठेवणारी मंडळीही होती. त्याला कारण कदाचित आपल्यावर 'कारकुनी'चा किंवा भटांच्या 'वर्कशॉप'मधील 'एप्रेंटीशीप' करणारा असा शिक्का बसू नये हे दडपणही असू शकते. आपपरभावाच्या वर उठून बघाल तर मला वाटते गझल लिहिण्यातील सातत्य ठेवण्यापेक्षाही स्वत:च्या जाणीवेतून गझलपासून दूर जाणे किंवा आधीपासूनच तिच्यापासून अंतर ठेवण्यासाठीही अधिक प्रगल्भतेची आवश्यकता असते. असे माझे प्रामाणिक मत आहे.
सुरेश भटांनी काफला हा संग्रह संपादित केला होता. त्यात गझल देण्याचा मोह आवरून शांत बसणारी अत्यंत मोजकी मंडळी होती. उद्देश हा होता की 'अभ्यासोनी प्रकटावे'. आपले चार-पाच शेर आणि त्यात भटांनी दुरुस्त्या करून आणखी एखाद-दोन शेर जोडून ठोकठाक केलेल्या रचना म्हणजे काही हेटाळणीचाच भाग नसतो. कारण हौस हीच कौशल्याची पायरी असते, हौसेतूनच नाद आणि नादाचे साधनेत नसेल तरी निदान दिनचर्येत, जीवनचर्येत रुपांतर होते. लोटगाडे लोटणारी बाळें पुढे मोठमोठ्या मेरेथोन स्पर्धांमधून धावतात की?. विशेषत: संगीत किंवा शायरीतील 'उस्तादी' ही उघड असते आणि इतर लेखन किंवा कला प्रकारातील 'उस्तादी' एकलव्याच्या प्रकारातील असू शकते. त्यात मराठी गझलेत अशी उस्तादी किंचितही नको, असे मानणारा एक वर्ग आहे. (प्रारंभी म्हटल्या प्रमाणे आपापले पक्के समज केलेले लोक) पण नवख्या कवीचा आशय भरकटवून न टाकता योग्य शब्द सुचविण्यापुरते सूचन-परिशीलन 'समान-पातळी'वरून चर्चा करून होत असेल तर ते अत्यंत उपयुक्त असते. मात्र त्यात संगीतासारखी घराणी आणि गंडे-धागे दोरे हे प्रकार असू नयेत. अर्थात ह्या गोष्टी ज्या क्षेत्रात आणि ज्यांना शोभतात त्यांचे ठीक आहे, पण मरठी गझलेत हे प्रकार वेडाचारासारखे भासण्याची शक्यता आहे. त्यासाठीच मी 'समान-पातळी'वरून चर्चा ह्या शब्दांची जाणीवपूर्वक पुनरावृत्ती करतो. मराठी गझलेत अशी चर्चा मी ह्यासाठी अपरिहार्य समजतो की एका व्यक्तीच्या अभिव्यक्तीची कक्षा, शब्दसंचय तसेच अभिप्रेत असलेल्या आशयजाणिवांशी सुसंगत शब्द निवडीचे भान ह्यांना मर्यादा पडतात. विशेषत: एकावेळी एखाद्याला एखाद्या आशयाशी सुसंगत, नेमका, शब्द सुचेलच असे म्हणता येत नाही. एकतर त्याच कवीला अपेक्षित असा योग्य, चपखल शब्द नंतर आठवेल किंवा आठवणारही नाही. त्यासाठी ती 'ओळ' किंवा 'संपूर्ण शेर' तेवढ्या अंतरावरून बघणारा कवीच हे काम करू शकतो. पण काही लोकांचे असे दृढ मत आहे की मराठी गझलेत असे सूचन-मार्गदर्शन म्हणजे 'इस्लाह' अप्रस्तुतच ठरते. म्हणजे वर जी सुसंगत शब्द सुचण्याच्या प्रक्रियेची चर्चा झाली, ती एकतर ते लक्षातच घेत नाही, किंवा ती त्यांना मान्यच नाही. मला मात्र वाटते, ह्यात आपण वर म्हटल्या प्रमाणे समान-पातळीवरील चर्चेचा सुवर्णमध्य स्वीकारला पाहिजे. तोच समकालीन गझलेसाठी अधिक हितकारक असेल. आपल्या खेड्यात म्हणतात "पाचा ठायी परमेश्वर" ह्याचा अर्थ असा की, कोणत्याही समस्येवर पाच लोक (अर्थात, ते समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक आहेत असे गृहीत धरून) पाच कोनातून बघतात तेंव्हा अधिक औचित्य साधले जाते. म्हणजे पाच लोकांच्या विचारात परमेश्वरासमान अचूकता-औचित्य असते. नेमके तसेच अनेकांच्या सूचना-चिंतनातून 'द्विपदी किंवा ओळ' ('शेर' किंवा 'मिसरा') अधिक आशयगर्भ होऊ शकते. आणि ह्याची अत्यंत मोजक्या ठिकाणीच आवश्यकता उद्भवते. कारण संपूर्ण गझलभर तर काही नवखा कवी अडखळत नसतो.
अपसमज जपणारे आस्वादक किंवा समीक्षावजा लेखन करणारे लोक नव्वदीच्या काळात म्हणत होते की भटानंतर गझल संपणार! कारण त्यांना भटांची गझल वगळता जे नवनवे शब्द आणि नवनव्या आशयांना गझलेत आणणारे नवीन कवी येत होते, त्यांचे लेखन दिसतच नव्हते. किंवा तेच भटांच्या प्रभावातून म्हणा की भटांच्या शब्दात 'मत्सरा'तून बाहेर येत नव्हते. ते हे बघतच नव्हते की भटांच्या गझलेत लोकभाषा होती पण त्यात ग्रामीण बाज नव्हता. नसणारच, कारण त्यावेळी शहरे आणि खेडी ह्यात भाषा-राहणीमान-उपजीविका ह्या संदर्भातून एक भाषिक-सामाजिक-व्यावहारिक अंतर होते. तरीही भटांनी झोपड्याचे छत 'शाकार'ण्याची प्रतिमा शेरात आणून ग्रामीण लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
"हा मला आता नको पाऊस प्रेमाचा - मोडके आयुष्य मी शाकारले कोठे ?"
त्या 'एका' प्रतीमेवर भटांना ग्रामीण रसिक मनातल्यामनात 'ज्ञानपीठ' देऊन टाकेल! आता तर नागरी समाज सोडा, खेड्यातही छत कसे 'शाकारतात' हे सांगणारी बोटावर मोजण्याइतकी माणसं राहिली असतील! झोपडे ही वस्तू, त्याचे छत 'शाकारण्या'ची संकल्पना आणि ते क्रियापद भटांनी आपल्या गझलेत आणून प्रतिष्ठित केलेत. हे भाषासंवर्धनाचे केवढे मोठे काम आहे? नागरी-ग्रामीण भाषिक अंतर 'शहरी लोकभाषा' आणि 'ग्रामीण लोकभाषा' अशा ढोबळ शब्दांनी व्यक्त करता येईल. श्री.म.माटे ह्यांनी ह्यासंबंधी छान विवेचन केले आहे. भिन्न भिन्न वर्गातून लोक बोलतात-लिहितात तेंव्हा त्यांच्या व्यावसायिक वैविध्यातून येणाऱ्या शब्दांनी भाषा समृद्ध होते. बघाना, तार्किकदृष्टांत आणि प्रतीमा-प्रतीकांच्या अनुषंगाने ग्रामीण क्षेत्रातून येणारी नामे - कुटार, चारा, नांगर, काकर (मातीत बी टाकायला ओढलेली खोल आणि लांब रेघ) पायखुटी, गावठाण, घुया, पंचांग, वरण-भाकर...इ. क्रियापदात - बैलांचे बुजाडणे, रस्ता फाकणे, तन्नावणे...इ. विशेषणात - बाजिंद्या, चतरा, निझूर, पडीत......हे आणि असे शहरी जीवनापासून लांब असलेले शब्द, तसेच भिन्न-भिन्न ग्रामीण जीवनातील अनुभव, नव्वदी नंतर ज्यांनी गझलेत आणलेत, त्याची जाणीव समीक्षकांच्या स्वरुपात वावरणाऱ्या गझलविरोधकांना होण्याची शक्यताच नव्हती. कारण गझलमधील परिवर्तनाकडे पाहण्यास त्यांना सवड नसून कधी एकदा भटांचे लेखन थांबते आणि कधी एकदा गझलेचे स्तोम (त्यांच्यामते गझलेचे स्तोम होते) शमते, अशाच आविर्भावाने त्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. पण आश्चर्य हे की २०१०च्या पुढे नव्याने लिहिणाऱ्या गझलकारांनी मात्र काळानुसार बदलत आलेली गझल वाचली, ओळखली. नव्वदी नंतर २०१० पर्यंतच्या दीड-दोन दशकात गझल तोलून धरणाऱ्या, तिचा वारसा पुढे नेणाऱ्या एका सेतूची भूमिका निभावणाऱ्या वर्गाची गझल नंतरच्या नवीन गझलकारांनी वाचली. तिच्या वेगळेपणामुळे तीमधील अनेक शेर त्यांच्या तोंडपाठ दिसलेत. प्रवासात किंवा बैठकी-संमेलनात हे नवीन लोक भेटले तर ते ह्या ज्येष्ठांना त्यांचे शेर आठवून-आठवून सांगत असल्याचे बघून आश्चर्यही वाटत होते आणि डोळे उघडत होते की, ज्याच्या नाकातील केस उपटला त्याच्याच डोळ्यात पाणी येते. गझलच नव्हे तर कोणतीही कला काही प्रयत्न करून कोणत्या प्रभावातून बाहेर काढावी लागत नाही, आपला अट्टाहास बाजूला करा, आणि तिला स्वभावात: येऊ द्या की ती आपोआपच आपल्या भिन्न, स्वरुपात प्रकट होते.
"फक्त मी बाजूस हटलो न् तिला वाट दिली
जा तुम्ही शब्दच जुळवा मी कविता केली."
इतके ते सोपे काम आहे, पण आपण अट्टाहासाने सोपे काम, कठीण नव्हे- अशक्य करून टाकतो! आपल्या शेजारी असलेल्या चाफ्याच्या कळ्या बघून मोगरा आपल्या कळ्यांना तसे रंग आणि आकार यावा म्हणून अट्टाहास करीत नसतो, म्हणून तो मोगरा राहतो! भटानंतर स्वभावत: गझल लिहिली गेली म्हणून तो वारसा पुढे ओढत आणला गेला. त्यानंतर मात्र २०१०च्या पुढे अधिक सहज, अधिक लीलया आणि अधिक संख्येने गझला लिहिणारी तरणी बांड पोरं-पोरी भटांचे भाकीत खरे करायला पुढे आलीत. त्यांचे गझललेखन बघून १९९०-९५ पासून हा वारसा चालविणाऱ्या लोकांना अक्षरश: हायसे वाटले! त्यांना ह्या नवीन लोकांच्या गजला वाचून यासाठी खूपच आनंद होत होता की समीक्षकांची दळभद्री भाकिते (भटानंतर गझल संपण्याची) खोटी ठरलीत, कारण आपण जशी आपल्या काळातील बदललेली गझल आपल्या परीने लिहिली, तेच काम हे नवीन लोक उल्लेखनीय रीत्या आणि अधिक संख्येने करून आपले कालचे प्रतिपादन आणि प्रयत्न सार्थ सिद्ध करीत आहेत. आजचा तिशी चाळीशीतील गजलकार, काल गझलकडे तुच्छतेने बघणाऱ्या लोकांना त्यांचे खांदे धरून हलवून आज सुरेश भटांचे द्रष्टेपण दाखवून देत आहे. कारण ह्या लोकांना त्यांची भाषा आहे, तसे त्यांचे आशयही आहेत. बदलत्या काळानुसार गझल बदलते आहे, म्हणजे ती आपले कालसंगत अस्तित्व सिद्ध करीत आहे. हेच मी २००२ च्या आसपास म्हणत होतो. त्याचे पुरावे असलेले माझे लेख आजही सापडतील. माझ्या ह्या म्हणण्याला आधार म्हणून मी बशीर 'बद्र' चा खालील शेर सांगायचो.
"पत्थर के जिगर वालो गम मे वो रवानी है,
खुद राह बनाएगा बहता हुवा पानी है"
पिढी दर पिढी जीवनातील समस्या, दुख, आनंद, संघर्ष सातत्याने बदलता असतो. त्यामुळे अशा प्रवाही असलेल्या मानव जातीला आपापले भिन्न अनुभव भिन्न ढंगाने मांडण्यापासून निदान जिवंत माणसाची सुटका नसते. म्हणून गझल भटांच्या नंतर संपेल कशी? तिला प्रत्येक पिढीच्या भाषेत उतरावे लागेल. शिवाय गझल ही लिहावी लागत नाही. अमूर्त शैलीतील चित्र काढावे लागते, मूर्त शैलीतील चित्र कुठे काढावे लागते? हत्ती मूर्त शैलीत काढायचा तर तो आधीच अस्तित्वात आहे, तुम्हाला केनव्हासवर केवळ त्याचा पाठलाग करावा लागतो. गझल कुठे लिहावी लागते? कुठे तरी एखादा आशय किंवा अनुभव त्रास देतो आणि तो छातीत घुमतो. मग शब्द त्याला लालित्यपूर्ण क्रमातून लटकत येतात. तेवढेच केवळ पहिल्या ओळीचे स्वातंत्र्य असते. नंतर आपण त्याच वृत्ताला किंवा मात्रांना बांधील असतो, 'काफिया'ही 'अलामती'सह दारात पहारा देतो. रदीफ तर फाटकासमोर उभा! आता कोण आणि कसा गझल लिहिणार? ह्या निश्चित चौकटीत आणि उपलब्ध वर्णमालेतून पुढील अनुभव आठवडा-महिना-वर्षभर लिहित रहा, तिला पूर्ण करा. खरेतर ती कधी पूर्ण होते हाही एक भ्रम आहे. चित्र, गझल, ललित लेख.... कधी पूर्ण होतच नसतात. म्हणून ते नितांत सुंदर असतात. पण दुर्दैवाने ह्याही काळात काही लोकांच्या इच्छाचिंतनात त्यांनीच सोडलेल्या भिन्न-भिन्न प्रजातीच्या गांधील माशा सतत घोंघावत असतात, आणि त्यांनाच त्या चावत असतात. उदा. काही लोकांच्या मते 'आपण वगळता' इतर लोक विशेषत: नवीन कवी तंत्रशरण गझल लिहितात. चार-दोन अपवाद वगळता खरे तर तसे काही नसते. उलट २०००च्या आधीपेक्षा आजची बहुतांशी गझल लक्षणीय अशा सहजतेने येत आहे. विशेषत: तंत्राचा बाऊ न करता किंवा विशेष ताठा न दाखवता स्वाभाविक प्रगल्भतेने नवीन कवी गझल लिहितात, सादर करतात आणि ऐकतातही. भटांना हेच अभिप्रेत होते. आपल्यानंतर आपले म्हणणे खरे ठरते असे लोक द्रष्टे असतात. त्यांचे कामही व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडील आणि मौलिक असते. मी तर म्हणतो- कोणत्याही भाषेचे संवर्धन करायचे, तीचे आयुष्य वाढवायचे असेल तर तीमध्ये गझल लिहिली जावी. आज मराठीची भाषा म्हणून खरी जपणूक करण्यात गझलकारांचा वाटा महत्वाचा आहे. काहीतरी बोलायचे म्हणून नाही, हे मी तांत्रिक आधारासह सांगतो. कारण गझलेच्या तांत्रिक आणि आशयात्मक अशा दोन्ही आवश्यकता म्हणून गझलकारांना सर्व पर्यायी शब्दांचा धांडोळा घ्यावा लागतो. वेगळ्या शब्दात सांगायचे तर आपणास मांडावयाच्या आशयाचे लोखंड त्या-त्या गझलच्या भाषेतील सर्व पर्यायी शब्दांच्या परीसांना टेकवून बघावे लागते. ह्या प्रयत्नात एखादा शब्द परीस निघतो आणि आपल्या आशयाचे लख्खदिशी सोने होऊन जाते. अशा नेमक्या शब्दशोधनातून होणारा आनंद म्हणजे नदीच्या पुरातून लाकूड ओढून आणणे किंवा मोठ्या विहिरीत पडलेली नेमकी आपली बादली सूर मारून वर काढण्यासारखा आनंद असतो. या प्रयत्नातून भाषेतील 'आपत्तीग्रस्त' शब्दांचा वापर आणि प्रतिष्ठापना होते, फेरफार होते. आपणास माहित आहे की पान, भाकरी आणि घोडा हे फिरविले नाहीत तर अनु. सडते, जळते, आणि लंगडे होते. तसेच अडगळीतील शब्द अडगळीतच राहिलेत तर ते मृत होतात आणि वापरले गेलेत की ते शब्द आणि त्या शब्दांची रूपे तसेच भाषा मरणापासून लांब राहतात. मातृभाषेचे मरण दूर लोटणे हे एक महान कार्य नाही काय? आणि मग ह्यावरून भटांच्या-
"अताच कोणी फकीर माझ्या घरापुढे ओरडून गेला
शिकस्त झालास तू न बेटा तुझे इरादे महान होते"
या ओळी मातृभाषेच्या संवर्धनाच्या संदर्भातून वाचल्यात तर किती प्रत्ययी आहेत?
( लेखक अल्पशिक्षित व्यक्ती असून ह्या लेखातील ज्या मता-प्रतिपादनात कुणाला सुधारणा सुचवायच्या असतील तर अवश्य संपर्क करावा. स्वागत आहे, कारण माझे काही अपसमज असू शकतात आणि अपसमजावर आधारित माहिती-मते पुढे जाणे अनिष्ट असते.)
...............................................
शिवाजी जवरे
८०७६०९५३१२
अप्रतिम लेख. प्रेरणादायी👌💐
ReplyDeleteअतिशय सुंदर लेखन.
ReplyDeleteआदरणीय शिवाजी जवरे यांच्या मनाचा मोठेपणा शेवटच्या टिपेमध्ये दिसून येतो. प्रणाम सर