चार गझला : हेमलता पाटील



१.

मिळेल पत्नी भले गोमटी माझ्यानंतर
काढणार का तुझी खरकटी माझ्यानंतर?

जरा लागला डोळा माझा उत्तररात्री 
चंद्रासोबत रात्र एकटी माझ्यानंतर

मला सासरी तुझी काळजी नसेल बाबा
असणारच ना घरी धाकटी माझ्यानंतर

ओले पक्षी ओली पाने रान ओलसर
तश्याच राहो स्मृती पोपटी माझ्यानंतर

तू जोपासत आहेस खरा कुंडीमध्ये
खुरटतील ती दोन रोपटी माझ्यानंतर

अस्तित्वाला माझ्या गोळा करून घे तू
अस्थी काही ठेव शेवटी माझ्यानंतर

मी जर झाले बाद जीवना डावामध्ये
पाठवशीलच नवी सोंगटी माझ्यानंतर

२.

आग व्यथेची मनात भडकत असेल बहुधा
एक अपूरी इच्छा वितळत असेल बहुधा

या ओठांची लाली वितळुन जाते कोठे?
हळूच त्याच्या ओठी मिसळत असेल बहुधा

मला आठवण येते त्याची..कोण सांगते?
वारा बिलगुन त्याला कळवत असेल बहुधा

तुझी वेदना मनात माझ्या बरसुन जाते
तिला मोकळे थोडे वाटत असेल बहुधा

उचकी सुद्धा आज हवीशी वाटत आहे
तोच आठवण माझी काढत असेल बहुधा

का थरथरला अन् दरवळला माझा गजरा?
मोगऱ्यास तो तिकडे हुंगत असेल बहुधा

कशी अचानक गझल मुखातुन त्याच्या पडली?
तिची ओढणी हवेत लहरत असेल बहुधा

या स्पंदांनी ताल चांगला धरला आहे
सूर तुझाही तिकडे लागत असेल बहुधा

डोळ्यामधुनी तृप्त भाव ओसांडत होते
ती बाळाला तेव्हा भरवत असेल बहुधा

३.

बांध होता..संगतीला कोण होते
वांझ एका बाभळीला कोण होते

ऊन तर नव्हते तिथे आले कधीचे
बैसले मग सावलीला कोण होते

नेहमीचा गंध नव्हता मोगऱ्या तो
सांग रात्री सोबतीला कोण होते

मी तिला घेऊन गेले सासरीही
एकट्या त्या बाहुलीला कोण होते

एकही चिटपाखरू नव्हते फिरकले
वावराच्या राखणीला कोण होते

बिलगुनी डोळ्यास रडते नेहमी ती
आणखी त्या पापणीला कोण होते

सुन्न रात्री एकटा तो पार होता
काजव्यांच्या बैठकीला कोण होते

सूर्य दिवसा चंद्र रात्री येत होते
फाटक्या त्या झोपडीला कोण होते

वाढले पत्रावळीवर खूप सारे
कावळ्यांच्या पंगतीला कोण होते

४ .

स्मृतींनी आपले आता वसवले गाव पाण्यावर
मजेने डोलते आहे मनाची नाव पाण्यावर

तिला मागून लाडाने धरायाचे ठरवले पण
पलटली लाट अंगावर...उलटला डाव पाण्यावर

बसावे वाटते रात्री तुझ्यासोबत नदीकाठी
लिहावे मस्त बोटाने तुझे मी नाव पाण्यावर

मलम लावू कशी सांगा प्रवाही विद्ध देहावर
दिसत आहेत दगडांनी दिलेले  घाव पाण्यावर

तृषेला भागवायाचा सुरू झालाच जर धंदा 
विकाया बाटल्या लेबल तुझेही लाव पाण्यावर
..............................................

हेमलता पाटील.

3 comments:

  1. वाह! चारही गझला अप्रतिम.. तरल👌👌💐💐💐

    ReplyDelete
  2. खुपच अप्रतिम गझल आहेत

    ReplyDelete
  3. सुंदर चारही गझल

    मिळेल पत्नी भले गोमटी माझ्यानंतर

    व्वा

    मी तिला घेऊन गेले सासरीही

    चंदनाच्या विठोबाची...
    आठवण झाली

    ReplyDelete