दोन गझला : सारंग पांपटवार



१.
ना तिला मी बोललो ना ती मलाही बोलली काही
आमुचा किस्सा पुढे गेलाच नाही शेवटी काही

सारखी मी आठवण काढत तुझी बसतो नखे चावत
हे रिकामेपण म्हणावे की म्हणावे आणखी काही

का मला उध्वस्त मी पाहू शकत नाही कळत नाही
का मला झाल्या नकोशा भोवतीच्या ओळखी काही

जे तुला मी पत्र पाठवणार होतो पाठवत आहे
फक्त आता मायन्यातिल अक्षरे मी खोडली काही

नीब मी टोचून थकलो आणि पाहत राहिलो पंखा
बोलली नाहीच माझ्याशी जराही डायरी काही

वाटले सज्जन मला जे जे इथे दुर्जन निघाले ते
गाववत नाही कुणाची फार आता थोरवी काही

दूरच्यांचे दाखले मी देत नाही पण खरे आहे
राहिली नाहीत नाती आपलीही आपली काही

                                
२.
उरले नाही कुणालाच रंगांचे कौतुक
जिकडेतिकडे चाललेय सरड्यांचे कौतुक

बघायला गर्दीला गर्दी जमली आहे
टाळ्यांना उरले आहे टाळ्यांचे कौतुक

कला हरवली हळूहळू मूर्तीकाराची 
करत राहिलेलो आपण साच्यांचे कौतुक 

भरगर्दीतुन नेले गेले सोने नाणे
बघणाऱ्यांना मावेना चोरांचे कौतुक

स्वतःस एका खोलीमध्ये बंद करून बघ
नसेल जर का तुला तुझ्या श्वासांचे कौतुक

प्रेमाचे वय विरहाचे भय मागे पडले 
वाटत नाही आता आभासांचे कौतुक

इतरांंचे वाभाडे मी ही काढू शकतो
करायला जमता यावे इतरांचे कौतुक

काही हुशार होते ते ही वेडे झाले
करत राहिले वेडे मग वेड्यांचे कौतुक

पुन्हा निघाले नवीन दिवसांचे गाऱ्हाणे
पुन्हा वाटले मला जुन्या दिवसांचे कौतुक

तुला पाहिल्यावरती वाटत असते केवळ
तुला घडवणाऱ्या सुंदर हातांचे कौतुक

देणे नाही घेणे नाही उगाच अपुले
ह्यांना ह्यांचे कौतुक त्यांना त्यांचे कौतुक
................................

सारंग पांपटवार

1 comment: