चार गझला : रमेश आराख



१.

पारध्याने पिंज-याचा लाविला इतका लळा
शोधला नाही निवारा पाखरांनी वेगळा

अर्जूनाचे राखण्या मेरीट गुरुजी धावले
अंगठा मागून केला दूर मोठा अडथळा

धार लावाया सुरीला ,घाम टपटपतो कीती
बोकडाला खाटकाचा येत आहे कळवळा

इंग्रजी कॉन्व्हेंटच्या भिंती डिजीटल बनविल्या
गावच्या शाळेतला स्वस्तामधे विकला फळा

ही उपाशी पाखरे भयभीत केली येवढी
वाटते बुजगावण्यासाठीच पिकतो हा मळा

मोरपंखांनी स्वतःचे पंख त्याने झाकले
नाचतांना ओळखू आला तरीही कावळा


२.

खरे मालक धनाचे बनविले कंगाल चोरांनी
लुटारू भामटे केलेत मालामाल चोरांनी

दरोडेखोर आल्यावर नव्या कळपात चोरांच्या 
दयाळू संत असल्याचा दिला अहवाल चोरांनी

लढाई हारण्याची शक्यता निश्चित झाल्यावर
पुढे मंदिर मशीदीचीच केली ढाल चोरांनी

दिली चघळायला हड्डी,गळ्याशी बांधला पट्टा
बिचा-या भुंकणाराला करुन बेहाल चोरांनी

कडी-कोंडा,कुलुप केवळ दिसाया ठेविले शाबुत
भुयारातून लुटले घर बघा दरसाल चोरांनी


 ३.


जर गुलामी नको उद्याची त
आज आताच तू लढाई कर

आज केवळ धुराच नांगरला
तो उद्याला गिळेल हे वावर

लाज झाकायची कशी सांगा
फक्त चिंध्या नकोत भाराभर

वेदना काळजातली समजा
हात हातात घ्या तिचा नंतर

चळवळीच्या अनेक वाघांचे 
होत गेले हळू हळू मांजर

वाढली भाषणातुनी बुंदी
हिसकली मग मुठीतली भाकर

तो उद्याचा हमाल वाटावा
लादले हे असे कसे दप्तर?

४.
 
नावाला कुंपण त्यांनी शाबूत ठेवले आहे
शेकडो बिळाच्या आतुन हे शेत चोरले आहे

त्या महासागरासाठी राजाने तजविज केली
विहिरी अन पाणवठ्यांना ज्याने आटवले आहे

मंदीर मशीदीमधल्या वादात ठेवले भांडत
कोणीही म्हटले नाही हे गाव भुकेले आहे

मेंढरे लागली नाचू कत्तलखाण्याच्या दारी
अच्छे दिन आले! आले! त्यांना सांगीतले आहे

जागे आहेत अजुनही की झोपलेत अनुयाई
पुतळ्यास फासुनी काळे त्यांनी चाचपले आहे

खडतर रस्ताही आता मज खडतर वाटत नाही
मायच्या जुन्या चपलांना मी अजून जपले आहे

कित्येक दिसाच्या नंतर तू पहिल्यावानी हसली 
तु माझ्यातील कवीला मुद्दाम डिवचले आहे

मुठभर शत्रूंशी लढतो ,आजही पराभुत होतो 
आम्ही लढवयै सैनिक,पण सैन्य विखुरले आहे

पिंज-यामधूनी आधी, मोकळी पाखरे केली
चोचींशी दाणे लाऊन  पंखास कापले आहे
.............................................

 रमेश आराख
 बुलडाणा
 9850304737

1 comment:

  1. चारही रचना सुंदर

    वास्तवता प्रखरपणे मांडली आहे

    ReplyDelete