सहा हझला : कालीदास चावडेकर



१.

तुला बोलायला कारण कशाला पाहिजे आता
उगा भांडायला कारण कशाला पाहिजे आता

तुझा हा जन्म गेला नाटके तर वठवण्यामध्ये
फलाणे व्हायला कारण कशाला पाहिजे आता

उभे आयुष्य घालवले, तुझे खोटेपणामध्ये
खरे वागायला कारण कशाला पाहिजे आता

कहाण्या खूप ऐकवल्या तुझ्या कुवतीपलीकडच्या
पुड्या सोडायला कारण कशाला पाहिजे आता

जुन्या कित्येक थापांनी चुकांची पालखी सजली
नवे मागायला कारण कशाला पाहिजे आता

२.

सांजवेळेला तिला मी ये म्हणालो
हात या हातात माझ्या दे म्हणालो

नावही अजुनी तिचे माहीत नव्हते
मी तिला हलकेच केवळ 'ए' म्हणालो

आज ती खेटून गेली मज अचानक
बंद झाला का तुझा वन वे म्हणालो

शेवटी समजावयाचे तर कितीदा
राग आला, दूर त्याला ने म्हणालो

काढुनी केव्हाच हे काळिज दिलेले
पाहिजे तर श्वाससुद्धा घे म्हणालो

ते म्हणाले तूच यावर बोल काही
आणि झाला वाद त्यावर जे म्हणालो

 ३. 

बोलतो ऎटीत की, तो बायकोला भीत नाही
(सांगतो कानात ऎका, हे तिला माहीत नाही)

कोणत्या शब्दात वर्णू त्या भयंकर आपदेला
बोलणे असतेच अवघड मीठही भाजीत नाही

फक्त नजरेच्या इशा-यानेच होते सर्वकाही
जाळ त्या नजरेतला तो कोणत्या आगीत नाही

हाणतो गुपचुप घरी तो तीस अथवा साठसुद्धा 
पण जगाला सांगतो की तो कधीही पीत नाही

ऐनवेळी मोहिमा त्या रद्द करण्या पाहते ती
त्याचसाठी कोणती तो योजना आखीत नाही

कौतुकाची गोष्ट लांबच, टोमण्यांनी धीर खचला
एकसुद्धा गोष्ट त्याच्या आणल्या साडीत नाही

चालला बाहेर की येतेच मांजर आडवे हे
धाडसाने तो कधीही पावले टाकीत नाही

शोधले ब्रम्हांड आणिक शेवटी समजून आले
आपली माती अशी जी कोणत्या खाणीत नाही

चांगल्याला तर्कटी अन् अप्सरा लफडेश्वराला  
का बरे नशिबात येते, काय हे आक्रीत नाही?

४.

हवेवर स्वार झालो मी, हिला सोडून आल्यावर
सुखाने ठार झालो मी, हिला सोडून आल्यावर

अती आनंद झाला की, असा भरपूर घेतो मी
नशीला बार झालो मी, हिला सोडून आल्यावर

असा ताणून देतो की मला उठवू नका कोणी
शनी- रविवार झालो मी, हिला सोडून आल्यावर

डबे शोधून थकलो मी, रिकामे वाजती ठणठण
उपाशी घार झालो मी, हिला सोडून आल्यावर

म्हणाले दोस्त बसु यारे, तुझे घर मोकळे आहे
जगाचा यार झालो मी, हिला सोडून आल्यावर

कधीही या कधीही जा, कुणी ना रोखतो मजला
खुला दरबार झालो मी हिला सोडून आल्यावर

अता ती तोडली खोट्या भितीची कुंपणे सारी
बडा सरदार झालो मी, हिला सोडून आल्यावर

पुन्हा वेडापिसा होतो, पिलांचा फोन आला की
किती बेजार झालो मी, हिला सोडून आल्यावर

किती ती काळजी करते, कळाले फोन आल्यावर
किती नादार झालो मी, हिला सोडून आल्यावर

५.

असेल बहुदा रास बिलंदर
म्हणून कालीदास बिलंदर

रस्त्यावरची खडी बोलते
डांबरचा सहवास बिलंदर 

खूपच सोपा होता पेपर 
का झाला नापास बिलंदर

झुळझुळणारा मिश्किल वारा
छळतो का पदरास बिलंदर?

मोबाइलला चिकटुन बसली
बोटे तासन् तास बिलंदर

फटीतुनी ढेकूण चावतो
रक्तपिपासू डास बिलंदर

काढावे वर्तूळ कसे मी
सतावितो कंपास बिलंदर

घंटा कंटाळुन चरफडते
शेवटचा हा तास बिलंदर

६.

आवरा ना मित्रगणहो ! फालतू नखरा किती
संपला अर्धाच खंबा अाणि हा बभ्रा किती

खूप दिवसांनी मिळाली आयती संधी अशी
सापडत नव्हताच हाती, खट्ट हा बकरा किती

दीडदमडीची फुकटची प्यायला मिळता जरा
आणले चकणा नी वेफर लोटला कचरा किती

चोंबड्या शेजारच्यांपासुन रहा सावध जरा 
कान ते टवकारलेले, चोरट्या नजरा किती

लार्ज झाला पेग बहुदा, तू दमाने ओत ना
फक्त दुसरा घेतला अन् लागला खतरा किती

टाक तू पाऊल जपुनी आत शिरताना घरी
बायकोला भास व्हावा शांत हा नवरा किती

काय जादू त्यात आहे दोस्तहो सांगा जरा
नाव त्याचे काढल्यावर चेहरा हसरा किती
.
          

3 comments:

  1. सर्व हजल रचना सुंदर,विनोदी...कालीदास कलंदर....वाह वा...
    अभिनंदन सरजी

    ReplyDelete
  2. अहाहा! मस्त सर... एक से बढ़कर एक👌👌

    ReplyDelete