दोन गझला : संदिप कळंबे

 

१.

फेकुनी कचऱ्यात गेली झक मला
दगदगीने घेतले दत्तक मला

टाकले देहात या इंधन कुणी?
कोण गेले बनवुनी चालक मला?

मी तुझ्या काठावरी आहे सुखा
एकदा बनवून बघ चातक मला

वाटताना देव उशिरा पोचलो
भेटली वाट्यामध्ये धकधक मला

वाचनालय माणसे झालीत ही
कोणते दुसरे हवे पुस्तक मला

२.

पिणारे किती? पाजणारे किती?
तुझे दु:ख कुरुवाळणारे किती ?

म्हणे पात्र पाहून खळखळ तुझी
तुला लागले वेड खारे किती ?

कुठे जायचे ते तुझे तू ठरव
तुझ्या भोवताली इशारे किती?

स्वत:हुन जळेना इथे एकही
हवेच्या जिवावर निखारे किती?

हवा प्यायल्यावर कळाले मला
दिशाभूल करतात वारे किती?

.........................................
 
संदिप कळंबे

No comments:

Post a Comment