दोन गझला : कविता क्षीरसागर


 
१.
असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण
कळले नाही केव्हा टिचला  ..आयुष्याचा रिताच रांजण

नादी लावुन झिडकारे ती .. जी माझ्या जगण्याचे कारण
पुन्हा पुन्हा लोचटाप्रमाणे कवितेचरणी घेते लोळण 

ठाउक असते काय गोंदले सटवाईने भाळावरती
मुठभर सौख्यासाठी मग ती खुशाल ठेवे स्वतःस तारण 

नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या
रात्र बिचारी सोशिक बाई .. दिसू न देते दुःखाचे वण 

आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनूही खुलते हल्ली 
जेव्हापासुन मनास माझ्या श्रीरंगाची  झाली लागण

दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काहीबाही
आणिक त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण 

२.

दुःखा किती अनावर होतोस भेटताना
दमछाक होत आहे कवितेत मांडताना

आयुष्य गात बसते घेते कठीण  ताना 
वीणा तटस्थ वाजे सुख दुःख भोगताना

रिक्षात कोंबलेली किलबील बालकांची
अन् दप्तरेच दमती वेळेत पोचताना

पक्के तिने ठरवले मी वाकणार नाही
गळला परंतु ताठा संसार ओढताना

संस्कार दूर्जनांचे होतात फार पटकन 
वाटे आजीस भीती गोष्टीहि सांगताना 

लक्षात ठेवण्याचा वेडा प्रयत्न होता
शेल्यास बांधलेली निरगाठ सोडताना 

भिंतीस जीभ फुटली पडले म्हणून अंतर
नाती मुकाट रडली घरदार मोडताना 

केली न मी अपेक्षा पूर्णांक जीवनाची
बाकी नसो कुणाची पण देह सोडताना
.......................................

कविता क्षीरसागर

No comments:

Post a Comment