दोन गझला : संजय विटेकर

 

१.
 
तोकडी पडली भरारी वाटले होते 
पंख माझे मीच तेंव्हा छाटले होते 

मान भेटावा तसा, भेटत मला नाही 
मीच मग दरबार माझे थाटले होते 

वाटले नजरेत त्या रेखीवपण.. कारण 
त्यात माझे मौन मी रेखाटले होते 

गीत गावू लागलो होतो तुझे, तेंव्हा…
ऐकणाराचे गळे का दाटले होते 

लागण्याआधी हवा, वरची पतंगाला
फाटण्याआधीच त्याला काटले होते 

काय आयुष्यात आहे, पहातो जेंव्हा
नेमके पंचाग तेंव्हा, फाटले होते 

नेहमी जमते, तसे माझे कुणाशीही
फक्त माझ्या काळजाशी फाटले होते

२.

हरतो पुन्हा पुन्हा पण माघार घेत नाही
जगण्यास मी कुणाचा आधार घेत नाही

घेवून टाक आता वापस मिठी तुझी तू 
ठेवून मी कुणाचे उपकार घेत नाही

पाठीत एकदा तर खंजीर मार ना तू
छातीवरीच सारे मी वार घेत नाही

हासून दुःख येते माझ्या समोर जेंव्हा
खपवून लाड त्याचे मी फार घेत नाही

हिस्सा कधीच नाही मागून घेत.. कारण
वाटून मी कधीही अंधार घेत नाही

माझ्याकडे कशाला बघतेस सारखे तू
मी ओढवून तसला आजार घेत नाही
...............................................

संजय विटेकर

1 comment: