१.
कधीही एवढा शापीत क्षण येऊ नये..
जगावे वाटते जेव्हा मरण येऊ नये.!
नसावे वाटते जेंव्हा कुणीही भोवती
अशा वेळी कुणाची आठवण येऊ नये.!
जरी फिरतोय आपण आपल्या कक्षेमधे
तरी दोघांमध्ये आता ग्रहण येवू नये.!
नजर लागू नये रात्रीस माझ्या यापुढे
अता वाट्यास माझ्या जागरण येवू नये.!
मलाही न्याय ना देता तिला आला कधी
म्हणुन कुठल्याच इच्छेने शरण येऊ नये.!
२.
दिली आहेस आयुष्या जरी वणवण घरी दारी
तरीही मी तुझी आहे मनापासून आभारी.!
गुलामी मीच पत्करली पुन्हा माझ्याच सवयीची
तुझ्या दारापुढे नेते मला माझीच लाचारी.!
तुझ्या पायात मी माझा कशाला मोडता घालू
नको आता नको तू ही फिरुन येऊस माघारी.!
व्यथा ना वेदना कुठल्या कशा येतील वाट्याला
तुझ्या नावावरी केलीत मी माझी सुखे सारी.!
नको लावून पाहू तू कधी अंदाज प्रेमाचा
कुणी हलक्यामध्ये जातो कुणाचे पारडे भारी.!
मला माझ्याच कक्षेचा सुगावा लागता कळले
किती आकाशगंगा या इथे आहेत शेजारी.!
३.
तसाही तू तिच्या सोबत कुठे आहे.
व्यथेची एवढी ऐपत कुठे आहे.!
दिवसभर मौन विळखा घालते आहे
बिचारी रात्रही बोलत कुठे आहे.!
कसा मी थांबवू विस्तार दुःखाचा
सुखाला तेवढी 'बरकत' कुठे आहे.!
मनाची धाव इतकी वाढली आहे
पुढे त्याच्या कुणी धावत कुठे आहे.!
जशी मी सोडली संगत तुझी वेड्या
तुझ्या चेहऱ्यावरी रंगत कुठे आहे.!
हवा होता मला तर कोपरा थोडा
तुझ्या जागेस बळकावत कुठे आहे.!
तुम्ही मोजाल माझे पाप यानंतर
तसेही पुण्य मी मोजत कुठे आहे.!
जणू परक्या ग्रहाची मी रहीवासी
इथे कोणीच माझ्यागत कुठे आहे.!
४.
रोज मला माझी परवड दिसते आहे.!
नको उद्याचा पुन्हा भरवसा देऊ तू
तुला आजही कुठे सवड दिसते आहे.!
झाले आहे मी आता सगळ्यात जमा
मला फक्त माझीच निकड दिसते आहे.!
मी शकुनाचे झाड होउनी सळसळते
पण माझ्याही आत घुबड दिसते आहे.!
किती कोवळी ही स्वप्ने दिसतात मला
पुढे पुढे होतील जरड .. दिसते आहे.!
जो तो बघतो आहे आता तुझ्याकडे
जरा वेगळी तुझी निवड दिसते आहे.
तिच्या भोवती करतो आहे प्रवास तो
ती मैलाचा एक दगड दिसते आहे.!
मीच चिरडले मस्तक माझ्या इच्छेचे
तरीही तिचे शाबुत धड दिसते आहे.!
थांबवून दाखव ना या काळाला तू
जर काळावर तुझी पकड दिसते आहे.!
............................................
ममता सपकाळ,
पुणे
पुणे
छान चारही
ReplyDeleteजगावे वाटते तेव्हा मरण येऊ नये...👌🦚