१.
जो श्र्वास आत घेतो तो मानवीय आहे
अंतीमत: प्रथमही मी भारतीय आहे
नाते तुझे नि माझे आहे प्रदीप्त जितके
नाहीच आप्त कोणी इतके स्वकीय आहे
मिळते विशुद्ध दीक्षा शांती समानतेची
ही जन्मभूमि पावन जग वंदनीय आहे
हे सप्तस्वर निनादे विश्वात वंदनेचे
धमण्यात मैफलीची ऊर्जा अरीय आहे
या बंडखोर ज्वाला मोर्चा निषेध नारे
मधुमासही तयांचे आंदोलकीय आहे
तेजाळतील जोवर हे सूर्य चंद्र तारे
हा अत्त दीप जागर प्राणास प्रीय आहे
कानात शीळ बोले जीवन अनित्यतेची
हे सूख दु:ख सारे परिवर्तनीय आहे
जागाच झोपलेला करतो समाज सारा
मी मूकनायकाचे संपादकीय आहे
२.
लखलाभ हे तुम्हाला तुमचे गनीम कावे
उजवे असोत कोणी अथवा असोत डावे
ज्यांना हवी विवशता भय आंधळी गुलामी
त्यांनी खुशाल जाती धर्मात या रहावे
या आमच्या जमीनी ही आमचीच सत्ता
अमुच्या तरी गळी का हे दोरखंड दावे
ते आग जाळणारी लावोत मत्सराची
आगीत लावलेल्या जळतील आगलावे
सौंदर्य मानवाचे जगण्यातुनी निखरते
श्रृंगारल्या व्यथांना का हे नको कळावे
हे दु:ख सर्व हारा जग अत्त दीप व्हाया
संस्कार वाहिन्यांनी चित्तात वादळावे
व्याकूळ कूस बोले या विश्व उत्पत्तीची
देता युगास दीक्षा मी भीमराव व्हावे
.....................................
.....................................
विनोद बुरबुरे
वेडूर्य अपार्टमेंट फ्लट नं १
सूरजनगर, यवतमाळ -४४५००१
भ्रमणध्वनी: ९०९६७०८३७७
No comments:
Post a Comment