दोन गझला : रवीन्द्र जवादे


 
१.
दुःख माझ्या आवडीचे फार आहे
ही सुखाची लाघवी तक्रार आहे

बाँब कसला? तोफखाना,युध्द कोठे
धर्म जाती हेच तर औजार आहे

जन्म आहे जाहला मग का पळावे
हेच जगणे स्वर्गमय संसार आहे!

हे मनातुन काढ आता मायबापा
फक्त मुलगा शेवटी आधार आहे

काळजाला लावतो डावावरी का
प्रेम इथला देखणा व्यापार आहे!

भूक कैसी,दंगलीचा म्होरक्या हो
चालते रे आपले सरकार आहे
        
 २.

पाय थकताना जमेशी चाल झाली
गाव येता नेमकी उलघाल झाली.

काल ना बागेत गेलो हिंडण्याला
भेट घेण्या पाखरे भवताल झाली!

वेधशाळेचा पुन्हा अंदाज चुकला
बातमी ही पावसा दरसाल झाली.

भेटली हिस्स्यात आई झोपडीच्या
मग गरीबी छान मालामाल झाली!

जन्म हा जोजावते ती माय बनुनी
याद ऐसी काळजावर शाल झाली.
.................................................

रवींद्र जवादे
मुर्तिजापूर

1 comment: