चार गझला : संजय गोरडे



१.

सोडला नाही कधी त्याने गळा 
केवढा दु:खासही माझा लळा! 

कोळसा आपण उगाळत राहिलो  
राहिला कोरा तुझा-माझा फळा...

तू तुझ्या इच्छेप्रमाणे वागलीस 
मी तुझ्यासाठी तरी वेडाखुळा! 

का जगाच्या सर्व मर्यादा मला? 
का तुला प्रत्येक रस्ता मोकळा? 

एक छोटी चूक झाली शेवटी 
मग पुढे झाला पराचा कावळा! 

फक्त थोडी ओल कायम राहिली 
संपला नंतर सरींचा सोहळा !!

२.

भेटण्याची खुळीच आस पुन्हा 
हो तुझा! हो तुझाच ध्यास पुन्हा!

ओळखीचे अनोळखी झाले... 
मग मिळाले गळे गळ्यास पुन्हा  

तू म्हणालीस एकदा भेटू 
फक्त काढू जुनी भडास पुन्हा 

व्यस्त आहोत एवढे आपण... 
कोण देतो कुणास त्रास पुन्हा? 

डोळियांनी नकोस ओवाळू 
नेहमीसारखीच हास पुन्हा 

तू परत जायला निघाल्यावर  
मी शिव्याही दिल्या जगास पुन्हा 

वेगळे आपले जरी रस्ते 
सोबतीला तुझे सुवास पुन्हा 

तुंबला चंद्र पापण्यांमध्ये 
ओठ हसले तरी उदास पुन्हा  

हे झरे, पाखरे, नदी, घरटी... 
आणि तू! आठवेल खास पुन्हा 

रोज येईल आठवण नक्की 
अन तुझाही अडेल श्वास पुन्हा  

भेट दारी निदान मरणाच्या! 
वेदनांची नको मिजास पुन्हा...

३.

वेचून घेतला मी माझा हरेक कणकण 
माझे तुला तरीही बघ लागलेच दूषण 

तू ओढ मृगजळाची लावून डोळियांना 
मी थोपवून माझ्या डोळ्यामधील श्रावण 

डोळ्यासमोर माझ्या गेली निघून गाडी 
जो पाहिला धरू मी गेला सुटून तो क्षण 

हातात फार काही नव्हते विशेष माझ्या 
मी फक्त वेदनांचे सांभाळलेत रांजण 

मी चक्क ऐनवेळी 'नाही' कसे म्हणालो 
एकाच त्या चुकीची तू लावलीस लामण 

भेटून काय झाला उपयोग सांग नक्की?
तू भेटलीस जेव्हा केलेस फक्त भांडण! 

सोयीनुसार येणे जाणे तुझे अवेळी 
मग एक काळजाचा मी रिक्त ठेवला खण

४.

जे वचन पाळायाचे ते पाळता आले कुठे?
आणि जे टाळायचे ते टाळता आले कुठे?

मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागलो आयुष्यभर 
दोन हळवे क्षण तुला सांभाळता आले कुठे 

तू तुझी प्रत्येक इच्छा जाळली म्हणतेस पण;
आठवांचे रान हिरवे जाळता आले कुठे?

मी कुठे तितका निरागस राहिलो आता म्हणा... 
अन तुला तेव्हाप्रमाणे भाळता आले कुठे? 

मी तुझ्या वाटेत अंथरलीत शब्दांची फुले!
पण तुझ्यासाठी मला गंधाळता आले कुठे?

कुंपणाबाहेरचा निवडुंग आहे मी तुझ्या 
भाळता आले तुला! ...कवटाळता आले कुठे?

..............................................................

संजय गोरडे,
नाशिक

3 comments: