तीन गझला : डॉ शेख इक्बाल मिन्ने

 

 
१.

माणसाला एक वाली पाहिजे
आणि त्याची भेट झाली पाहिजे

खायला नसले तरीही चालते
फक्त आपुलकी मिळाली पाहिजे

व्हायला क्रांती नव्याने या जगी
एकदा ठिणगी उडाली पाहिजे

ग्रीष्म होता नेहमी माथ्यावरी
सावली थोडी मिळाली पाहिजे

माणसे येतील ही ना सांगता
पालखी आधी निघाली पाहिजे

राहिले नाहीच काहीही खरे
लाट सत्याचीच आली पाहिजे

युद्ध असता झोप ही आली कशी
माणसाला जाग आली पाहिजे

लोकही म्हणतील तुजला चांगले
पण तुझी किंमत कळाली पाहिजे

२.
माणसाशी माणसासम वाग मित्रा
वास्तवाला जाणुनी घे जाग मित्रा

दुःख आणिक सुख मिळे ठरल्याप्रमाणे
हा नशीबाचा असे रे भाग मित्रा

माणसाने माणसाला प्रेम द्यावे
ईश्वराचे प्रेम कायम माग मित्रा

तू कधी सोडू नको माणूसकीला 
अन नकोही तू धरू रे राग मित्रा

जीवनाची वाट आहे खूप खडतर
ध्येय ठेवुन त्याच मागे लाग मित्रा

प्रेम ओलावा जगाला दे मनाने
लागली आहे जगी रे आग मित्रा

या जगा 'इक्बाल' सांगे कळकळीने
इज्जती वरती नको रे डाग मित्रा

३.
आयुष्याशी खेळ चालला आहे
सत्ता म्हणजे खेळ वाटला आहे

टाळी, थाळी दिवे लावणे झाले
मृत्यू इतका स्वस्त जाहला आहे

रोग घेउनी विमान देशी आले
मजूर पायी देश चालला आहे

शत्रू सीमे आत पोचला अमुच्या
खोटे बोलू तरी लागला आहे

आज लागली सर्व भिकेला जनता
देश तरीही पुढे चालला आहे?

फक्त वल्गना आणि घोषणा यावर
अंधश्रद्ध हा भक्त भाळला आहे

काम मिळेना, धंदे बुडले सगळे
एक समुह पण खूप वाढला आहे

निष्पापांवर खोटे सारे खटले 
जावे कोठे न्याय झोपला आहे

घटना आहे धोक्यामध्ये आता
वाचवण्या 'इक्बाल' ठाकला आहे
..................................................

डॉ शेख इक्बाल मिन्ने
औरंगाबाद
   

3 comments:

  1. अप्रतिम गझला आहेत डॉक्टर साहेब. शेवटचा मक्ता तर लाजवाब

    ReplyDelete
  2. तुझी किंमत कळाली पाहिजे...
    अगदी सत्य डॉक्टर साहेब

    फारच सुंदर गझला

    ReplyDelete
  3. आज लागली सर्व भिकेला जनता
    देश तरीही पुढे चालला आहे?

    व्वा व्वा क्या बात क्या बात खुप जबरदस्त डॉक्टर साहेब.

    ReplyDelete