दोन गझला : जयश्री कुलकर्णी


१.
गोष्ट का ती वळत नाही जी मनाला कळत आहे
प्रश्न काट्या सारखा कायम मनाला सलत आहे

आजवर मी फार ताबा ठेवला होता मनावर
पाहिल्या पासून त्याला तोल माझा ढळत आहे 

पांगली गर्दी भुकेने गावही शहरात गेले 
पारही आता स्वतःशी एकटा बडबडत आहे

सूज हास्याची कशाने वाढली बघ चेहऱ्यावर
आत कुठल्या विषाणू वेदनेचा  छळत आहे 

कोंडतो का श्वास हल्ली भोवती नसता कुणीही
हे कशाचे भय मनाला आणखी कुरतडत आहे

 २.

ठेवले दडवून आहे सत्य ते बोलून पाहू
कोण मग उरलेत नंतर आपले मोजून पाहू

आपलासा वाटतो पण आपला आहे किती तो
घेतला हातात आहे हात तो सोडून पाहू

आणखी जगणार कुठवर, होवुनी आपण लव्हाळी 
ह्या प्रवाहाच्या विरोधी एकदा पोहून पाहू

काळजी दुनियेस इतकी वाटते सल्ले फुकटचे
चल उडत गेली म्हणू फाट्यावरी मारून पाहू

का अशी पुरते कळेना धावपळ जन्मास अख्ख्या
तो जुना शाळेतला रविवार चल शोधून पाहू
..................................................

जयश्री कुलकर्णी

1 comment: