१.
पायरीभर अंतरावर सांडली
अमृताची सर जरा वर सांडली
कोणता आला ऋतू देहामधे
रक्तपुष्पे परकरावर सांडली
फेस हा केला किनाऱ्यावर कुणी
नीळ कोणी सागरावर सांडली
याद तान्ह्या लेकराची दाटली
दूध होउन झंपरावर सांडली
थांबली नाचायची ही पाउले
शांतता या घुंगरावर सांडली
झाड होते कागदावर काढले
सावली या अंतरावर सांडली
या भुकेने भाव उतरवला असा
लाज अवघी शंभरावर सांडली
ज्या कृपेने चिंब गालिब अन तुका
ती कृपा या पामरावर सांडली
कोणत्या होतो तिरावर जन्मलो
राख अन कुठल्या तिरावर सांडली
देव टोपण लावण्याचे विसरला
दौत साऱ्या अंबरावर सांडली
२.
लाज तांबडी मनात राहुन जाते...
एक ती घडी मनात राहुन जाते
एक हिमालय व्यक्त करून होतो पण
एक टेकडी मनात राहुन जाते
खुणवत असतो डोह किती वलयांनी
आपली उडी मनात राहुन जाते
निजताना साऱ्या झोपेला रुतते
ही कशी खडी मनात राहुन जाते
(जुळूनही येतात बंध तुटलेले
एक पण अढी मनात राहुन जाते)
या दुनियेच्या नजरेला घाबरते
गोष्ट नागडी मनात राहून जाते
मरून जातो थंडीमध्ये कोणी
एक घोंगडी मनात राहुन जाते
............................................................
- वैभव देशमुख
सुंदर गझला वैभव!
ReplyDelete