१.
प्रेमामध्ये डुबलो आपण
नंतर मग गुदमरलो आपण
फार लांबचा प्रवास होता
फारच लवकर थकलो आपण
फक्त आपला अहं जिंकला
नात्यामध्ये हरलो आपण
हात सोडला चालत गेलो
एक एकटे उरलो आपण
बरेच झाले भांडण झाले
आता दोघे सुटलो आपण
२.
पुन्हा बघ फोडला आहे जुन्या वादास फाटा तू
विषय साधाच होता पण किती गंभीर केला तू
जगाच्या शांततेबद्दल पुढे बोलू सविस्तर पण
तुझे जे घर जळत आहे विझव आधी निखारा तू
मला तर शुद्धही नाही नशा चढली तुझी इतकी
नशा उतरायला माझी नशेवर या उतारा तू
कधीचा ड्राफ्ट मधला हा जुना मेसेज आहे की
"घरी मी एकटी आहे जरा येऊन जा ना तू"
कुणाची मागणी होती खरोखर सांग आता तू
उगाचच लावला नाही जुना फोटो डीपीला तू
तुझ्या स्पर्शात मोहरल्या फुलाला माहिती आहे
फिरूनी गाव आलेला कसा आहेस वारा तू!
-स्वाती शुक्ल
मुंबई
No comments:
Post a Comment