१.
तुझ्याशी बोलण्याचे मी अताशा टाळते आहे
तुझ्यावर भाळते आहे तरी सांभाळते आहे
तुला सोडून जातांना मला हे ज्ञात आहे की
स्वतःला मीच माझ्यातून आता गाळते आहे
नकोसे वाटते आता सुखाचे ऊन देहाला
पुन्हा अश्रूंअभावी मी किती भेगाळते आहे
खरोखर आजवर निष्पन्न झाले काय रागाने
म्हणूनच आज प्रेमाने जीवाला जाळते आहे
तुला सांगूनही जर का पटेना प्रेम हे माझे
तुझ्यासाठी कशाला आसवे मी ढाळते आहे
मला सोडून का जातोस इतक्या दूर तू सजना
नजर मग सारखी दारापुढे घोटाळते आहे
तुला मी ठेवले आहे मनाच्या मंदिरी माझ्या
तुला बघते कुठे नुसते तुला ओवाळते आहे
२.
फार मृत्यूचा दरारा वाढतो
जीवनावरचा पहारा वाढतो
धावतांना धाप लागे खूप पण
थांबली की कोंडमारा वाढतो
झाकले मागे ढगांच्या तोंड तू
पावसा...ये शेतसारा वाढतो
स्पर्शूनी जाता मनाला सय तुझी
आठवांचा मग पसारा वाढतो
लाखमोलाचा जरी ऐवज तुझा
वेळ गेल्यावर घसारा वाढतो
तू नको स्वप्नात येऊ सारखा
गोठत्या थंडीत पारा वाढतो
३.
मनाला लागली हुरहूर तू भेटून गेल्यावर
हजारो लागल्या उचक्या तिथे तू याद केल्यावर
कशी असते कसे सांगू जवळ नसतोस तू जेंव्हा
जशी ही बाग दिसते बघ फुले तोडून नेल्यावर
इथे ना जन्मभर कोणी कुणा साधे बरे म्हटले
किती कौतुक होते एकदा माणूस मेल्यावर
जरासे पाहिले वळुनी तिने बस एकदा त्याला
किती मग रंगल्या चर्चा फुकाच्या पान ठेल्यावर
नशा ही केवढी चढली तुझ्या मोहात पडल्याने
कशी भागेल मग तृष्णा तुझ्या एकाच पेल्यावर
.................................................
किर्ती वैराळकर - इंगोले
(पुणे)
No comments:
Post a Comment