चार गझला : रत्नमाला शिंदे

 

१.

शोकही उरणार नाही जीव गेल्याचा
एवढा होऊ नये उपचार रोगाचा

जाहिरातीसारख्या येतात आठवणी
चित्रपट चालूच आहे श्वास घेण्याचा

खंत राहिल जिंकल्याची जिंकल्यानंतर
एवढा खेळू नये हा खेळ हृदयाचा

गैरसमजाने तुझ्याशी जोडले नाते
आणि मग परिवार झाला गैरसमजाचा

खूपजण असतील मागे जीव गेल्यावर
फायदा असतोच थोडा जीव गेल्याचा

२.

घसरली पातळी माझी ,चला हेही बरे झाले
मिळाली वेगळी गर्दी , चला हेही बरे झाले 

तुझ्या नजरेत थोडेसे जगाला पाहता आले
उघडली आणखी खिडकी, चला हेही बरे झाले

जुने काहीतरी शोधत सतत कोणीतरी आले
इथे झाली नवी वस्ती , चला हेही बरे झाले

कुणाला जास्त कळते तर ,कुणाला फार थोडेसे
मला काही कळत नाही, चला हेही बरे झाले

कितीदा एवढ्यासाठी जगाने वाहवा केली
मुक्याचा रोल केला मी , चला हेही बरे झाले

३.

माझी अनंत आहेत रुपे..... माझ्या अवतीभवती
हे काचांचे अनंत तुकडे.... माझ्या अवतीभवती

काय नेमके पाहत राहू काय नेमके  शोधू
रंग हरवलेली ही दृश्ये.... माझ्या अवतीभवती

प्रवास माझा कधीच आहे संपुनही  गेलेला
रेंगाळतात उगीच रस्ते... माझ्या अवतीभवती

जाता जाता सांडत गेले काय नेमके सांगू
काही स्वप्नांचे पापुद्रे.... माझ्या अवतीभवती

माझ्या अवतीभवती काही उरले नाही आता
दिसतात मला तुझेच डोळे ... माझ्या अवतीभवती

आत दिसे ना बाहेर दिसे... सर्व रिकामे दिसते
नसलेल्या बुद्धीचे पडदे.... माझ्या अवतीभवती

ह्याच कारणामुळे मला ही स्थिरता आली बहुधा
धावत आहे मी वेगाने... माझ्या अवतीभवती

कधी एकदा आकाशाला मी शाप दिला होता
फिरकत नाही अता चांदणे... माझ्या अवतीभवती

बनावेच लागले मलाही वेड्यांपेक्षा वेडे
जमले होते काही वेडे... माझ्या अवतीभवती

४.

किती ठिकाणी फसले होते हात तुझे
नव्हते तुझ्याच हातांमध्ये  हात तुझे

रंग लागला आहे माझ्या स्वप्नांना
स्वप्नामध्ये दिसले होते हात तुझे

गेली असती शेवट माझी मजल कुठे
माझ्यासाठी पायच झाले हात तुझे
 
भरली आहे माझी ओंजळ कसे म्हणू
पाहिलेत मी फक्त रिकामे हात तुझे

किती काळ मी लटकत आहे अधांतरी
देतात मला अजून झोके हात तुझे

मला द्यायला काही नाही तुझ्याकडे
माझ्यासाठी शिल्लक उरले हात तुझे

-रत्नमाला शिंदे
  मुंबई
 

 

1 comment:

  1. एवढा होऊ नये उपचार रोगाचा...👌👌

    हरकत नाही अता चांदणे...👌

    मस्त

    ReplyDelete