चार गझला : अविनाश सांगोलेकर



१.
कोरोनावर मात करूया,म्हणती सारे ! 
परंतु येता प्रसंग बाका , दडती सारे ! 

एक विषाणू इवलासा , पण दहशत मोठी ,
आला म्हणता , घाबरून मग पळती सारे ! 

ह्या व्याधीला नाही पर्वा कोणाचीही ,
मात्र तरीही बेपर्वाई करती सारे ! 

" मोठी राष्ट्रे , खेळी त्यांची ", कुणी म्हणाले ,
तिच्यामध्ये निरपराध मानव मरती सारे ! 

योद्धे सारे आपत्तीशी झुंजत असता , 
राजकारणी परस्परांशी लढती सारे ! 

औषध केवळ नसे पुरेसे  कळल्यानंतर , 
योगसाधनेकडे शेवटी वळती सारे ! 

' अविनाश ' म्हणे , माणूस नसे हो लेचापेचा ,त्याच्याशी जे लढती , अंती हरती सारे !

२.
समरांगणी पुरता फसे अविनाश हा ! 
गझलेमुळे हरला नसे अविनाश हा ! 

गझले , तुला तव ' काफला ' कथितो पहा :
" तव प्रार्थनी रमला असे अविनाश हा ! 

परमेश्वरा , तव साधना कठिणातली ,
शिखरी तरी ' सहजी ' वसे अविनाश हा !

पडला जरी नित संकटी जगतामुळे ,
विसरून ते वरती हसे अविनाश हा ! 

जगता पडे बघ प्रश्र्न हा वरचेवरी : 
" सुखदुःख हे जगला कसे अविनाश हा ? "

३.
 
फूल मजला एकही माहीत नाही !
प्राक्तनी काटे ,तरी मी भीत नाही !

मद्यपींनो,का असे दारात येता ?
दुःख झाले खूप,तरी मी पीत नाही!

थोडकीही का करावी मी अपेक्षा ?
कर्मयोग्याची अरे, ही रीत नाही !

दाद तुमची वाटते मज जीवघेणी ,
दुःख माझे गझल  किंवा गीत नाही !

लोकहो,गझलेत झाल्या खूप टोळ्या ,
मात्र 'अविनाश'च कुण्या टोळीत नाही !

४.

हे गावगुंड आता , माजून फार गेले ! 
कोण्या घरामधूनी , घेऊन नार गेले ! 

लज्जा मुळी न त्यांना , पर्वा मुळी न त्यांना , 
त्यांच्यामुळेच सारे , तेजीत बार गेले ! 

साधा विरोध त्यांना , रुचला मुळीच नाही , 
साऱ्या विरोधकांना , देऊन मार गेले ! 

कोणास हाक मारू , मदतीस आज माझ्या ? ,
ज्यांच्यावरी भरोसा , सारेच यार गेले ! 

' अविनाश ' जाणतो हे , ढोंगी खुशाल तेही , 
माझ्या शवास अंती , घालून हार गेले ! 
...............................................

प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर ,
डी - २०२ , विंडसर रेसिडेन्सी , 
बालेवाडी फाटा , बाणेर , 
पुणे - ४११०४५
भ्रमणध्वनी : ९८५०६१३६०२
ई- मेल : sangolekar57@gmail.com

2 comments:

  1. खूप छान गझला अविनाश सर.
    फूल मजला एकही माहीत नाही.. ही गझल वाचताना आदरणीय सुरेश भट साहेबांची आठवण झाली

    ReplyDelete
  2. मात्र अविनाशच कुण्या टोळीत नाही...

    फारच छान

    ReplyDelete