१.
हलकेच स्वप्न नयनी रुजवून जा सख्या रे
हातात हात आता गुंफून जा सख्या रे
अस्वस्थ जीवघेणी ही वेदना उराशी
फुंकर जरा अनोखी घालून जा सख्या रे
जमले मला न सारे शब्दात मागणे पण
थोडाच भार माझा पेलून जा सख्या रे
नसते जरी अपेक्षा आजन्म सोबतीची
काहीच क्षण सुखाचे देऊन जा सख्या रे
परसात ओंजळीभर पडला सडा सुखांचा
आनंदवन सुगंधी फुलवून जा सख्या रे
होणार भेट अपुली नक्कीच सांजवेळी
थोडा प्रकाश तिमिरा दाऊन जा सख्या रे
घडते घडावयाचे असते जसेच ठरले
अलवार भाग्य माझे होऊन जा सख्या रे
२.
क्षण दुराव्याचा मला युग वाटते आहे जणू...
एक कविता अर्थ शब्दाला अशी देते पहा
भावनांची ती उधारी फेडते आहे जणू...
अंतरे नात्यातली का जाणवू तुज लागली
हात बघ आता तुझा मी सोडते आहे जणू...
एकट्याने दसदिशांना धावणे अनिवार्य बघ
कस्तुरी वेड्या मृगाला छेडते आहे जणू...
पापपुण्याची शिदोरी एकदा करुनी रिती
सर्व बाकी राहिलेली जोडते आहे जणू...
बोलणे जे टाळले ते शब्द बघ रुसले असे
जीभही रागावूनी ते खोडते आहे जणू...
चूक माझी!छंद माझा! दोष मग का सागरा
लाट ही माझा मनोरा मोडते आहे जणू...
.....................................
रेणुका खटी पुरोहित
छान
ReplyDelete