तीन गझला : नजीम खान



१.

आतुनी आधी मला खणतोय मी
मग कुठे जाऊन मिणमिणतोय मी

मी व्यथेच्या पैंजणाचा घुंगरू
फार सांभाळून रुणझुणतोय मी

ऊन मी आहे नि आहे बर्फ ती
केवढा अलवार रणरणतोय मी

प्रश्न निष्ठेचा निरुत्तर राहतो
जिंदगानीला सखी म्हणतोय मी

मी गज़ल जेव्हा लिहाया लागतो
वाटते की पैठणी विणतोय मी
२.

मी दिवा झालोय जेव्हा झोपडीचा
डाव वाऱ्याचा किती होता रडीचा

त्या वळाची मी यशस्वी वाट केली
एक वळ हातावरी होता छडीचा

वास्तवाचे भान त्याच्या लेखणीला
ऐकतो जो स्वर भुकेल्या आतडीचा

तू उजळणीचे असे साधेच पुस्तक
मी सहज सोपा धडा बाराखडीचा

ऐकली ज्यांनी न अंगाई कधीही
चंद्र नाही त्या मुलांच्या आवडीचा

तारखांसोबत किती वाढून जातो
आकडा मी सावकारी चोपडीचा
३.

एकमेकांवर मरू..
ये जरासे मोहरू..

पूर प्रेमाचाच मी
मी कशाला ओसरू..

फूल माझे मन सखे
मन तुझे फुलपाखरू..

पैंजणे माझे तुझ्या
स्पंदनांचे घुंगरू..

हे शहर आहे इथे
स्वप्न काही कातरू..

ते करू या जे हवे
देश हा सुंदर करू..
.........................

नजीम खान
चिखली जि. बुलडाणा
मो. ९८५०८६७१६२
najeemkhan.gazal@gmail.com

1 comment: