१.
किती आळ आले जरा बोललो तर
पुन्हा वाद झाले जरा बोललो तर...
भल्या वागण्याने अहिंसाच होते,
उरी चार भाले जरा बोललो तर...
जरा बोललो, मीच बदनाम झालो...
कुणी चाल चाले जरा बोललो तर
जमानाच हा कौतुकाचा निघाला..
'मसीहा' म्हणाले जरा बोललो तर !
'जपावे स्वतःला' म्हणाले मला ते,
स्वतःलाच भ्याले जरा बोललो तर
नशेच्या पुढे सर्व लाचार होती...
'भरा आज प्याले' जरा बोललो तर
२.
अंदाज घे मनाचा... नाही म्हणू नको तू
घे कौल अंतराचा... नाही म्हणू नको तू
सांगून टाक सारे, सांगू नको बहाणे...
बघ नेम ना उद्याचा, नाही म्हणू नको तू !
नुसता सुगंध नाही, काळीज हे फुलाचे
हा गंध अत्तराचा... नाही म्हणू नको तू
रंध्रात पेरले मी, आसक्त ते निखारे
आवेग मीलनाचा... नाही म्हणू नको तू
जाऊ नकोस इतकी, हुरळून तू यशाने
घे ध्यास त्या नभाचा... नाही म्हणू नको तू
संदर्भ लागतो का, नशिबातल्या खुणांचा ?
हा खेळ प्राक्तनाचा... नाही म्हणू नको तू
होकार द्यायचा तो, देऊन टाक आता
दे शब्द काळजाचा... नाही म्हणू नको तू !
भावनांना धार आली.. लेखणी तलवार झाली
शब्द आता सूर्य झाले अक्षरे अंगार झाली !
तापलेल्या काळजाला निश्चयाचा जोर आला
शोषितांनी सोसलेली वेदना एल्गार झाली !
काय सांगावी कुणाला बेगडी नीती जगाची
'मी' पणाचा आव नुसता, माणसे लाचार झाली
कोण आले? कोण गेले?, भास नुसते वेढणारे...
चार भिंती, एक खोली, शेवटी आधार झाली
झाकल्या डोळ्यात आता चेहरा दिसतो कुणाचा?
अंतरंगी का तुझी ती आकृती साकार झाली?
कोंडलेल्या भावनांनी केवढा कल्लोळ केला..
शेवटी ही लेखणीही लाजुनी बेजार झाली !
काळोखाच्या पडद्यामागे किती निराळी दुनिया !
ही मायावी, निर्दय खुनशी, क्रूर मतलबी दुनिया !
साध्या भोळ्या आयुष्यांवर, वार नेमका करते,
अंधाराला रक्त मागते चटावलेली दुनिया !
कुरघोडी अन् घातपात हे मंत्र यशाचे त्यांच्या..
दिसेल त्याला फसवत असते, कारस्थानी दुनिया !
मुर्दाडांच्या सभेत 'लज्जा'...जणू द्रौपदी होते,
साळसूदपण सुखे मिरवते, ही व्यभिचारी दुनिया !
पतिव्रतेसम, साधी सोज्वळ दिसे निरागस दिवसा,
मात्र रात्रभर रंग उधळते, ही नटरंगी दुनिया !
फणा काढुनी, प्रश्न उभा हा, मानवजाती पुढती..
प्रत्येकाला मनाजोगती, कशी मिळावी दुनिया ?
..........................................
व्यंकटेश कुलकर्णी
No comments:
Post a Comment