तीन गझला : आनंद खांदेवाले

 

१.

तोडली मी नाळ जेव्हा प्राक्तनाची
जन्मली जाणीव तेव्हा जिंकण्याची

सोडला निःश्वास मी आता सुखाने 
रीत लागे मज कळाया जीवनाची

बंद दाराने दिली का साद मजला
काय होती खूण ती मज थांबण्याची 

पत्थराला पूजिले तू नेहमी रे 
याद आली ना कधी तुज माणसाची 

सारले मी दूर थोडे त्या बटांना 
आस होती चंद्र माझा पाहण्याची 

२.

आयुष्य ना सोपे कळे  जगता क्षणी
मृत्यो तुझ्या प्रेमात मी कळता क्षणी

जपले किती देहास ह्या मी जन्मभर
त्यालाच त्यांनी जाळले मरताक्षणी

जातो कुठे सोडून आत्मा देह हा
घर बदलतो त्याची मुदत सरताक्षणी

तो स्पर्श मायेचा बने अपवित्र का
आंघोळ ते करती घरी शिवताक्षणी

आता सुखे निजतो मला उठवू नका
भेटेन म्हणतो विठ्ठला निजताक्षणी

३.

साहू किती मी यातना, आता मला घेऊन जा
होती मनी या खंत जी, गझलेतुनी ऐकून जा

सांगायच्या होत्या तुला, गोष्टी किती साध्या सुध्या
जाऊ नको टाकून अर्धा डाव हा खेळून जा 

माझे असे नाहीच काही या जगाशी वाकडे
मग का असे ते भांडले, तू कारणे सांगून जा 

आव्हान हे नाही मुळी, जिंकायचे कैसे तुला
मृत्यो तुझ्या मी स्वागता, आहे उभा, येऊन जा

संपायचे आयुष्य हे, वळणावरी रे कोणत्या
ठाऊक ना कोणा परी,  गाणे तुझे गाऊन जा
........................................

आनंद खांदेवाले

6 comments: