ठेऊ नकोस आशा की एवढ्यात भेटू
नाहीच भेटलो या तर त्या जगात भेटू
अडवायचे कसे मी डोळ्यातल्या सरींना
लपवायचेत अश्रू भर पावसात भेटू
तू हो उनाड वारा मी ही सुगंध होते
होऊन एक दरवळ रानावनात भेटू
गर्दीत या मनाशी संवाद होत नाही
जाणायचे स्वतःला तर एकट्यात भेटू
भेटीस टाळण्याला नाही जिथे बहाणा
कायम स्मृतीतल्या त्या हळव्या क्षणात भेटू
२.
आठवून बघ कशात काही आठवते का
तुला आपले प्रेम जराही आठवते का
अजूनही मी शहारते ती भेट आठवुन
प्रथम आपली भेट तुलाही आठवते का
पाऊस आणि पावसामधे आपण दोघे
पावसातही झाली लाही आठवते का
हजार शपथा...आणा भाका ....प्रेमामध्ये
जन्मभराची तुझीच ग्वाही आठवते का
सुरवातीला होकाराचे पारायण अन
शेवटचे ते तुझेच "नाही" आठवते का
आनंद शोधला पण कायम व्यथा मिळाली
स्वप्नातल्या सुखांची वाटेत सांज झाली
परतून जायचे मन केले तिने जरासे
इतक्यात पाखराची कळली तिला खुशाली
त्या मायचे कधीही दिसले न त्यास अश्रू
दाबून हुंदका जी घरट्यातुनी निघाली
संसार थाटतो तो नंतर तिच्या नव्याने
कित्येकदा चितेवर ती एकटी जळाली
समजायचे मला जे समजून घेतले मी
त्याने फुल्या दिलेल्या पत्रात तीन खाली
४.
वाटले सरपण चुलीच्या आतले विझले
थेंब शिंपडता निखारे त्यात आढळले
घेतला कर्जामधे गळफास बापाने
जीवनाचे व्याज माझ्या मायने भरले
तू जवळ असता तुझा ना लागला पत्ता
पण तुझे अवशेष एकांतात सापडले
मी प्रवाहाच्या विरोधी वाटले कारण
ना प्रभावाच्या कुठे विळख्यात गुरफटले
शेवटी विस्फोट झाला वेदनेचा पण
शक्य झाले तेवढे मी आत आवरले
हातचे राखुन कधी मी ठेवले नाही
पण मला त्याने सदाही हातचे धरले
तो अपेक्षा ठेवुनी होता गुलाबाची
मीच चुकले मी तिथे काळीज अंथरले
........................................
प्रिती जामगडे
प्रिती जामगडे
चारही चांगल्या
ReplyDeleteभर पावसात भेटू ...♡☺
मीच चुकले मी तिथे काळीज अंथरले
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी...