१.
फार आता बोलणेही टाळतो मी .
टोचणारे शब्द सारे गाळतो मी .
सरण आहे पेटलेले आत माझ्या ,
रोज तेथे या मनाला जाळतो मी .
तेच सत्ताधीश होती नेहमी अन् ,
त्याच त्या रे आमिषांना भाळतो मी .
शोधले पण लागला ना शोध माझा ,
हरवलेली जिंदगी मग चाळतो मी .
बहरलेल्या या सुगीला हाय आता ,
सोनपुष्पे बाभळीची माळतो मी .
बलवान काळ मोठा करतो कमाल येथे .
त्याने सिकंदराला केले निढाल येथे .
तू सोडणार नाही जर 'मी'पणास राजा .
सांगेल हीच माती होते महाल येथे .
सारे जबाब वेडा तो भाकरीत शोधे ,
कळले कधी न त्याला माझे सवाल येथे .
सुटलेत बघ लुटारू, तू जाग रात सारी ,
अंधार जाळण्या घे हाती मशाल येथे .
तू नाव घे शिवाचे , समशेर लेखणीची ,
रोखेल तुज कुणाची ,आहे मजाल येथे .
शेरात शोध त्याला, गावेल 'अनिल' तेथे ,
गझलेत सांडले बघ ,त्याचे खयाल येथे .
........................................
अनिल एस.पाटील
दोन्ही गझला.. लाजवाब👌👌
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteदोन्ही रचना खूप सुंदर.
ReplyDelete