तीन गझला : अनिता बोडके

 

 
१.

 एकदा घडला गुन्हा घडणार नाही यापुढे 
जीव कोणावर कधी जडणार नाही यापुढे

आठवण येते तुझी अन चिंब होते पापणी
ठरवते दररोज मी रडणार नाही यापुढे

जायचा नाही तुझ्याविण एक क्षण माझा जरी 
पण तुझे माझ्याविना अडणार नाही यापुढे

भेटली शिक्षा मनाला जीवघेणी एवढी 
मन तुझ्या जाळ्यात तडफडणार नाही यापुढे

थांबण्या आधीच ठोके एकदा भेटून जा
हे खुळे काळीज धडधडणार नाही यापुढे

सोडुनी दुनिया तुझी आले नभाच्या पार मी
मी तुला केव्हाच सापडणार नाही यापुढे

२.

तुझ्या स्वाधीन झाल्यावर अशी माझी दशा होती
गुलाबी तो गुन्हा होता.. गुलाबी ती सजा होती

प्रिया सोडून आले मी जगालाही तुझ्यासाठी
मला सोडून जाण्याची किती घाई तुला होती

पुन्हा बाहेरही नाही तिथुन पडता मला आले
तुझ्या त्या दोन डोळ्यांची निराळी ती नशा होती

किती बोलायचे होते तरी ना बोलता आले
जगाची केवढी पर्वा.. तुला होती मला होती

कधीकाळी तुझ्यासाठी किती वाटा तुडवलेल्या
ऋतू होता निराळा तो.. निराळी ती हवा होती

तुला आठवतही नाही तुझ्या-माझ्यातले काही
इथे प्रत्येक पानावर तुझी माझी कथा होती

३.

आठवणीची आहे वर्दळ अवतीभवती माझ्या!
तुझाच हा कस्तूरी दरवळ अवतीभवती माझ्या!

यासाठी मी दुःख कुणाला सांगितले ना माझे
अश्रूंचे तर हजार ओघळ अवतीभवती माझ्या!

उजाड केली बागच माझी या वेड्या वार्‍याने 
कशी दिसावी आता हिरवळ अवतीभवती माझ्या!

मुकाट असते झुळूक माझी आसपास वार्‍याच्या
सुसाट असते त्याचे वादळ अवतीभवती माझ्या!

धावत होते त्याच्या मागे तहान घेवुन माझी
अखेर कळले फसवे मृगजळ अवतीभवती माझ्या!

लाख झरे दुःखाचे वाहो मुळीच पर्वा नाही
एक सुखाचा आहे ओहळ अवतीभवती माझ्या!

शब्द रूसले माझे गेले सोडुन मला कधीचे
अन कोर्‍या पानांचा गोंधळ अवतीभवती माझ्या!

अनिता बोडके,
नाशिक

1 comment: