१.
खोल पुरलेली व्यथा आहे
इंधनाची शक्यता आहे...
जे नको ते चांगले नाही
हीच ती विद्रूपता आहे...
लाल पिवळा भात खातो तो
वेचलेली अक्षता आहे...
तो कधी नाही म्हणत नाही
बाप म्हणजे पुर्तता आहे...
रोजचा तह आत्महत्येशी
जीवघेणी ही कथा आहे...
२.
समजत नाही घोकत बसतो
मी शिक्षेला पुढे ढकलतो
ती वास्तूला घरपण देते
तो जगण्याचे हप्ते भरतो
खूप बोलतो मी माझ्याशी
मी एकाची जागा भरतो
लगीन ठरले हुंडा ठरला
बाबा म्हणतो होइल.... करतो
रोज तिच्यावर सक्ती होते
शय्या कण्हते पंखा रडतो
३.
एवढ्याने तो उखाणा पोरका झाला
नाव घेताना वधूला हुंदका आला
डोरले बघता वराला प्रेयसी स्मरली
त्रास झालेला विचारुन या कधी त्याला
आठवण येता तिची तो आसवे गिळतो
बाटली कण्हते रिकामा राहतो प्याला.
खूप रडली एक मुलगी त्या वरासाठी
शेवटी आला तिच्या एकांत वाट्याला
दोन मेले दोन जगले लग्न झाल्यावर
शांतता लाभेल आता या समाजाला
..............................
भूषण अहीर
तीनही रचना सुंदर
ReplyDeleteतो जगण्याचे हप्ते भरतो...🌹
दोन मेले दोन जगले लग्न झाल्यावर
शांतता लागेल आता या समाजाला...👌