१.
दोघांमधील 'मी ' ला बाजू जरा करू या
अन् वाद आपसातिल चल आज विस्मरू या
भौतिक सुखात आपण विसरून बैसलो जी
मानव्यता पुन्हाती प्रांजळपणे स्मरू या
इतरां मधील अवगुण शोधायच्या अगोदर
ऐना जरा स्वतःच्या चर्ये पुढे धरू या
सारून दूर अभिनय चल एकदा खरोखर
दोघे परस्परांच्या डोळ्यातुनी झरू या
शस्त्रे करी तयांच्या लखलाभ हो तयांना
आपण करात अपुल्या बस लेखणी धरू या
योजुन प्रकाश सारा गिळला जरी तमाने
जाळून काळजाला रोशन शहर करू या
सक्षम पिढी कवींची चालून येत आहे
आपण ' मसूद ' आता बाजू जरा सरू या
२.
फूल , पाने टाळुनी मी सत्य जेंव्हां मांडले
शेर माझे या जगाला खूप झोंबू लागले
हीच बस होती तफावत आपल्या अश्रूं मधे
तू निरंतर ढाळले अन् मी निरंतर जाळले
जिंकला शत्रू पुन्हा कष्टाविना अपुला लढा
ऐन वेळी मित्र सारे आपसातच भांडले
बोलला खोटे असे ठासून दर वेळेस की
बोल त्याचे सर्व आम्हा सत्य वाटू लागले
वाट जर निव्वळ फुलांची चालुनी आलास तर
जीवना मग पाय इतके कां तुझे रक्ताळले ?
३.
चित्रा मधे फारच सुखी मज वाटले होते शहर
प्रत्यक्ष दुःखांनी किती पण ग्रासले होते शहर
रक्षा तयांची घेउनी आलो परत गावी अता
स्वप्ने उरी जी साठवुन मी गाठले होते शहर
वरवर जिवंता सारख्या होत्या जरी खाणाखुणा
आतून पण सारे कधीचे वारले होते शहर
शहरासही गावाकडे होते खरे तर जायचे
चालू शकत नसल्यामुळे पण थांबले होते शहर
टिपलेच मृत्यू ने तरी त्यांना पथातच शेवटी
टाळावया मृत्यूस ज्यांनी त्यागले होते शहर
पांथस्थ अनवाणी कुणी चालून गेले वाटते
तेंव्हाच तर सारे असे रक्ताळले होते शहर
फुटपाथ वरचे सोबती सोडून गेल्या पासुनी
कित्येक राती एकटे मग जागले होते शहर
कळलीच नाही ती कधी नावे कुणाला आजवर
द्वेषामधे ज्यांनी खरे नादावले होते शहर
ज्यांनी मरणदारातही जातीय खेळी खेळली
निर्लज्जतेवर खूप त्यांच्या लाजले होते शहर
४.
दहशत तुझी मनातुनी काढून टाकली
नौकाच वादळा अम्ही जाळून टाकली
बसतोस गप्प मीडिया ठरवून तू असा
जिव्हा जणू कुणी तुझी कापून टाकली
स्पर्शूनिया तळे कुणी केले अवीट अन्
गंगाच पूर्णतः कुणी बाटून टाकली
दररोजच्या रडू मुळे त्रासुन अखेर मी
झाडून सर्व आसवे ढाळून टाकली
उत्साहच्या भरा मधे त्यांनी अजाणता
माझी कबर जितेपणी बांधून टाकली
माणुस म्हणून ज्या घडी मी संपलो खरा
श्रद्धांजली मलाच मी वाहून टाकली
परक्या समान ज्या घरी अपुलेच वागले
अख्खी हयात त्या घरी काढून टाकली
...................................................
मसूद पटेल
९६०४६५३३२२
चारही गझला सुंदर
ReplyDelete