दोन गझला : भागवत देवकर

 

१.

सोबतीने जात होती येत होती
साथ माझी फक्त गरिबी देत होती

बोचणारे दुःख अंगी भरजरी पण
एक हसरी वेदना काखेत होती

का उडाला एवढा तो उंच पक्षी
भारली जादू कुणी राखेत होती

ऊन कळले घर मलाही सोडल्यावर
पालकांच्या जिंदगी छायेत होती

केटलीने इंजिनाला शोधल्यावर
 दावली शक्ती किती वाफेत होती

२.

डोक्यामध्ये जुनाट वारा आहे नक्की....
आठवणींचा दूर पसारा आहे नक्की...

परतून येत नाही कुणीच वर गेलेला....
गगनामध्ये एक निवारा आहे नक्की.....

मांजर मांजर जर का सारे चिडवत होते....
रंग तुझ्या डोळ्यांचा घारा आहे नक्की....

लिहिल्यावरती सारे पुसते लवकर इतक्या..
हृदयी माझ्या एक किनारा आहे नक्की..

आयुष्याच्या मिरचीचा जर ठसका झाला...
नशिबामध्ये तिथे निखारा आहे नक्की....

....................................

भागवत देवकर

 

 

1 comment:

  1. साथ माझी फक्त गरिबी देत होती ...

    अप्रतिम

    ReplyDelete