१.
बोलतो ते येत असते माझिया आतून मित्रा
कोणता देऊ पुरावा मी तुला याहून मित्रा ?...
कोण विश्वासू जगी या भेटला नाहीच जर,तर
' मी इथे आहे ' तुला हे ठेवतो सांगून मित्रा...
कोणता किंतू मनाशी बाळगू आता नको तू
मी मनाची सर्व दारे ठेवली खोलून मित्रा...
चाळणी उपयुक्त ठरते सत्व शोधाया म्हणोनी
मी स्वतःला घेत असतो नेहमी चाळून मित्रा...
जर कधी आलोच दारी शोधण्या मित्रास मी,तर
तू उरीची एक जागा ठेव सांभाळून मित्रा....
भार वा आभार यांची ना बरी मैत्रीत भाषा
बोल काहीही ,कधीही ,तेवढे सोडून मित्रा.
वादळाच्या वंशजांनी मान्य केले हे अखेरी
मी विजा झेलून सुद्धा यायचो उमलून मित्रा...
वेगळ्या विश्वात कुठल्या मी रमू तू सांग मजला ?
टाकले आहेस सारे विश्व तू व्यापून मित्रा...
२.
जे स्वप्न मनी होते ते सत्याने खुडले माझे
त्यानंतर नाही नाते स्वप्नांशी जुळले माझे..
मज खोटा ठरवत ज्यांनी आरोप नको ते केले
आरशास दाखविल्यावर ते शत्रू बनले माझे
निर्लज्जपणे जपती ते खोट्याशी त्यांची निष्ठा
मी बेचिराख झालो पण अस्सलपण जपले माझे..
नात्यांनी आपुलकीने दूर सारले मज जेंव्हा
तेंव्हा केवळ नाते ह्या गझलेशी उरले माझे..
काळोख भेदण्यासाठी पहाट आलीही होती
पण हवा ढगाळत गेली अन सत्य न दिसले माझे..
लाभावे भाग्य असे की शेरांना काही माझ्या
गझलेचे सच्चे प्रेमी देतील दाखले माझे..
मरणास मिळाली कोठे यापेक्षा सुंदर जागा?
गझलेच्या झाडाखाली मी प्राण सोडले माझे...
...................................... ......
प्रसाद माधव कुलकर्णी
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी
ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर
पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)
( ९८ ५०८ ३० २९०)
Prasad.kulkarni65@gmail.com
मी स्वतःला घेत असतो नेहमी चाळून मित्रा...❤
ReplyDeleteगझलेच्या झाडाखाली प्राण सोडण्याची कल्पना मस्त...