चार गझला : चंद्रकांत धस



१.

प्रेमात मी जरासा आसक्त होत गेलो
झालीस देवता तू, मी भक्त होत गेलो

मी गंधहीन होतो आयुष्य भोगताना
तू ओंजळीत घेता प्राजक्त होत गेलो

भेटीविना असा मी अतृप्त राहिलो की
तू भेटलीस तेंव्हा आरक्त होत गेलो!

तू बोललीस सारे, मी बोललो न कांही
संकोचल्यामुळे मी, अव्यक्त होत गेलो
 
का दोष प्राक्तनाचा आजन्म मानला मी?
ते घाव सोसताना मी सक्त होत गेलो

पर्याय खूप होते माझ्या समोर तेंव्हा
माणूस चांगलासा, मी फक्त होत गेलो

२.

मी पाहिले जगाचे रंग वेगळे
प्रत्येक माणसाचे ढंग वेगळे

देवादिकांसही वाटून घेतले
भक्तांमधील त्या सत्संग वेगळे

मोठेपणा कसा मोजायचा तुझा?
माझे-तुझे किती पासंग वेगळे

संस्कार माणसांचे सारखे कुठे?
व्यक्तीनुसारही व्यासंग वेगळे

चालू कशास मी वाटेवरी जुन्या?
मी बांधले मनाशी चंग वेगळे

सुटणार का तिढा सीमेवरील तो?
मुद्द्यावरी किती वादंग वेगळे?

झालीस माय तू पत्नी असून ही
कळले मला तुझे हे अंग वेगळे
          
४.

कोंडतेस का उगीच अंतरात वादळास?
टाकतेस का वृथाच संभ्रमात वादळास?

जन्मलीस घेउनीच तू मुठीत संकटास 
ओढतेस का उगीच संकटात वादळास?

जाहली प्रसन्न काय वादळे तुलाच सांग?
मागतेस शांतझोप वादळात वादळास

मुक्त विहरतेस, पूर्ण व्यापलास आसमंत
ठेवतेस का उरात, बंधनात वादळास?

तूच वेड लावलेस, भोवती फिरे तुझ्याच  
सांगतेस टाकण्यास मात्र कात वादळास

चांदरात, तू भरात, हात घेत तू करात 
बोलतेस धुंद गात्र, ये भरात वादळास

ते थकूनही कधी विसावले तुझ्या कुशीत
निजवतेस थोपटून गीत गात वादळास

५.

तुझे अंतरी, गंधाळणे कशासाठी?
फुला भोवती घोटाळणे कशासाठी?

अबोला तुझा हा बोलला किती कांही
मला हे असे कुर्वाळणे कशासाठी?

असा लाभला एकांत खूप वर्षांनी
तरीही तुझे हे टाळणे कशासाठी?

नको वाटलो जन्मात या तुला साथी
वडाला पुन्हा गुंडाळणे कशासाठी?

भरोसा जरा प्रेमावरी असूदे ना
उगी हे जिवाला जाळणे कशासाठी?

कसा दूरचा पल्ला तुझ्याविना गाठू
तुझे थांबणे, रेंगाळणे कशासाठी?

किती संयमाने वागलो तुझ्याशी मी
मला पाहुनी ओशाळणे कशासाठी?
..........................................

चंद्रकांत धस
निगडी, पुणे-४११०४४
भ्रमण ध्वनी ९९७०४५२५२५

3 comments:

  1. वाह वा..
    प्रेमात मी जरासा आसक्त होत गेलो...
    चारही गझला छानच..

    ReplyDelete
    Replies
    1. 👍 धस साहेब
      खूपच सुंदर आहेत चार गझला..
      अशाच तुमच्या कविता व गझला ह्या दिवाळीत वेगवेगळ्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध होवोत आणि आम्हाला वाचायला मिळो हीच ईश्वरचरणी अपेक्षा !

      .....रमेश काळे

      Delete
  2. चारही गझला खूप छान काका.
    अप्रतिम👌😊

    ReplyDelete