दोन गझला : गौतम राऊत

 

१.

कासवाला पुन्हा वारसा पाहिजे
सारखा झोपणारा ससा पाहिजे

सांगतो मी तिला छान दिसतेस तू
ती तरीही म्हणे आरसा पाहिजे

बोलणे हे तुझे जर निखा-यापरी
मग मला व्हायला कोळसा पाहिजे

शेत प्रेमात आहे तुझ्या एकटे
एक साधी मिठी पावसा पाहिजे

लाख शपथा दिल्या घेतल्या आजवर
आणखी कोणता भरवसा पाहिजे

२.
जर भावलीच नाही इथली हवा मला
का पालटून देता.. दुसरी दवा मला

द्या द्यायची सजा ती आहे कबूल मी
पण चूक काय केली ते दाखवा मला

मी बांधण्याअगोदर हा फ्लॅट घेतला
समजू नका कुणीही येथे नवा मला

काही असे जवळचे मी मित्र पाहिले
देतात रोज खोटी जे वाहवा मला

केलीच चूक मी ही कळपात राहिलो
सांगून रोज जातो कोणी गवा मला..
.....................................................

गौतम राऊत 
ब्रम्हपुरी, चंद्रपूर
८५५१८८६००९

1 comment: