दोन गझला : ओमप्रकाश ढोरे

 

१.

दुसऱ्यास वाचण्याची,लावा सवय स्वतःला
तेव्हा कळेल जागा,अपुलीच आपल्याला

ज्ञानी असून तू ही,ठरला अखेर वेडा
केवळ जगी मिरवतो,अपुल्याच मी पणाला

दुनियेत सर्व काही,हे आलबेल नसते
जे आज घडत आहे,घडणार ना उद्याला

एकांत माणसाला,शिकवून खूप जातो
अन् गोंधळात दुःखे,येतात भेटण्याला

जर अंग अंग लाही,लाहीच होत आहे
आवाज दे खरा तू,आतून पावसाला

लावून शिस्त घे तू,थोडी तरी स्वतःला
हे लोक सुज्ञ आहे,शिकवू नको जगाला
      
 २.

पापण्यांची वेस ओलांडून आली
आसवे भेटीस,कंठातून आली

उन्मळूनी झाड पडले आठवांचे
बातमी दारी तुफानातून आली

दूर गेल्या पाखरांचे हाल झाले
जी थव्यांनी आज रानातून आली

शोधते ती सारखी जागा लपाया
सावली भित्री उजेडातून आली

या भुकेला ठार मारु एकदाचे
वाचलेली ओळ गाण्यातून आली

आत्मनिर्भर राहण्याला सांगणारी
घोषणा मग राजवाड्यातून आली
..........................................
 
ओमप्रकाश ढोरे
९४२३४२७३९०

1 comment: