१.
माज डोहाचा बुडाला वाटते
मी सरळ भिडलो तळाला वाटते
चौकशी ऐकून माझी वाटले
काळजी माझी जगाला वाटते
शेर कुठलाही असो कविता असो
पण तुझा संदर्भ आला वाटते
आवळा गेला म्हणुन मोर्चे किती
कोहळा नाही मिळाला वाटते
बागडत मन राहिले कोठेतरी
देह कामावर निघाला वाटते
जायचे आहे जिवाने ठरवले
जायची भीती जिवाला वाटते
लागले आहे पलीकडचे दिसू
जन्म जाळीदार झाला वाटते
२.
हात धराया लाजत होते
सुख तर माझ्या सोबत होते!
मन केव्हा कोणाला दिसते ?
चोरी डोळ्यांदेखत होते!
उगाच नव्हते तृप्त किनारे
ते लाटांतुन भेटत होते!
कुठेतरी दरवळतो चाफा
तुझी मिठी पडल्यागत होते
डसले काहीतरी मनाला
उभी रात्र किंचाळत होते
ती अन् ते वादळही निजले
काळिज का घोंगावत होते?
जाणिव बोथट होते आहे
ही जाणिव अव्याहत होते!
ती जाताना दिसली नाही
त्यावेळी अंधारत होते!!!
३.
दिसते साडी एखादी ..पदराचा चाळा एखादा
उघडा खण काळजा कपाटामधे असावा एखादा
आपोआप निखळतो वा उचकटला जातो ओळीतुन
घराबरोबर ना फिरणारा साधा वासा एखादा!
दिवसभराची खळखळ सरली विसावलो मी डोहागत!
माझ्यामध्ये खडा सयींनो आता टाका एखादा!
बंद मुठीच्या आत बियाणे शहारते अन् सुखावते
जेव्हा बघते आसुसलेला तयार वाफा एखादा!!
अंधाऱ्या गल्लीत दिवा मी पेटवायला गेल्यावर
चवताळत अंगावर येतो तिथला दादा एखादा!
कट् करतो मी कॉल पुढे मग पुसतो मन कोरे करतो
बोटांच्या जर नकळत नंबर डायल झाला एखादा!
तुझ्या सही ने केली आत्म्या सगळी कर्मे देहाने!
तुला पुढे असणारच आहे फळात वाटा एखादा!
मुष्किल आहे पुर्णपणे निर्दोष असा माणुस मिळणे
निसर्गा तुझ्याकडेच नाही तसला साचा एखादा!
..............................................
दत्तप्रसाद जोग,
गोवा.
🙏 सुंदर
ReplyDelete