दोन गझला : अविनाश चिंचवडकर



१.
 
दोस्तहो यापुढे वेगळा मी बरा 
हे पहारे खडे वेगळा मी बरा
 
धूर्त ही माणसे धूर्त यांचे हसू 
घेतले मी धडे वेगळा मी बरा
 
मी असा भाबडा ते तसे बेरकी 
वाट ना सापडे वेगळा मी बरा
 
वेदने तू तरी साथ दे शेवटी 
घालतो साकडे वेगळा मी बरा
 
हाय ते का अशी मारती माणसे 
क्रौर्य हे केवढे वेगळा मी बरा
 
ते जरी कोरडे माझिया अंतरी 
आसवांचे सडे वेगळा मी बरा
 
येऊद्या वादळे पेटवा आणखी 
चेतनेचे लढे वेगळा मी बरा
 
२.
मनातले तुफान हे तुला कधी कळायचे 
मनातल्या मनात मी किती असे जळायचे 
 
तुला तरी कशास मी ऊगाच दोष द्यायचा 
मला न भान राहिले जगासवे वळायचे 
 
ऋणात कालच्या तुझ्या असेन मी उद्यासही 
जरी न तार हे पुन्हा तुझ्यासवे जुळायचे 
 
भरून आत वेदना वरून मी हसायचे 
असेच बेगडीपणे जगात मी रूळायचे 
 
मलाच हाय साधली न रीत येथली जरा 
तुला तरी कशास मी पुन्हापुन्हा छळायचे !
...........................................
 
अविनाश चिंचवडकर 
बंगलोर
Mobile - 9986196940
 

4 comments:

  1. जरी न तार हे पुन्हा तुझ्यासवे जुळायचे

    खूप अव्वल रचना आहे सर दोन्ही सुद्धा

    ReplyDelete
  2. खूपच भारी सर, खूप भन्नाट आहेत..

    ReplyDelete
  3. दोन्ही रचना खूपच सुंदर .

    ReplyDelete