चार गझला : प्रमोद खराडे



१.

मंद केल्यावर दिव्याची वात मी 
आरसा मग पाहतो जोशात मी 

बिलगुनी मौनास बसतो कैकदा
कैकदा सुटतो उगाचच गात मी 

बातमी साऱ्या जगाची काढतो
पाहतो कोठे स्वत:च्या आत मी

पाहतो टाळायला जो चेहरा
राहतो त्याच्याच सहवासात मी

लक्ष लवकर लागले मोक्षाकडे
अडकलो ना फारसा देहात मी 

२.

हीच असते कमाल लोकांची
लोक करतात ढाल लोकांची 

ज्यास निवडून आणले त्याने 
काढली धिंड काल लोकांची 

फक्त ओझेच वाहतो आहे 
देश वस्ती हमाल लोकांची 

काय आहे नवे विकायाला
काय बोली दलाल लोकांची 

आपली वाटतील जेव्हा ती 
तोच बदलेल चाल लोकांची 

काढला प्रश्न तो महत्वाचा
चाललेली गजाल लोकांची 

खंत याचीच वाटते आहे
कीव केव्हा कराल लोकांची

३.

बांगड्या टिचल्यात बांधावर
अन धनी बसलाय पारावर 

लगबगीने माजघर हलले 
कोण देते हाक दारावर 

राबलो शेतात आहे मी..
भिस्त आहे पण दलालावर 

प्रश्न अवघड एवढा आला
पोरगी थिजलीय बाकावर 

पोरगा शहरात रमलेला
बाप गावी राखतो वावर

त्या मढ्याची राखही झाली
पूस डोळे अन् रडू आवर 

४.

जेवढा मौनात उतरत चाललो 
तेवढा सौख्यास गवसत चाललो 

एकटा नाहीस आहे साथही 
नेहमी आत्म्यास सांगत चाललो 

चांगले वाईट वाटेवर जरी
चांगले तितकेच वेचत चाललो 

पाऊले टाकीत गेलो हे खरे..
मी खरेतर श्वास मोजत चाललो 

आत्मरंगी रंगलो कित्येकदा 
कैकदा प्रेमात झिंगत चाललो 

लक्ष होते लागले मोक्षाकडे 
याचसाठी वाट सोसत चाललो  

सोबतीला कैकदा आले तुका 
नित्य मी त्यांच्याच सोबत चाललो 

बुद्ध माझ्या आतही बाहेरही
आत आता लख्ख उजळत चाललो
.....................................................

प्रमोद खराडे

2 comments:

  1. गझला छानच आहेत प्रमोदजी!

    ReplyDelete
  2. गझला छान

    बातमी साऱ्या जगातील काढतो
    Know yourself

    पोरगा शहरात रमलेला
    बाप गावी राखतो वावर

    भयानक वास्तव

    ReplyDelete