तीन गझला : योगिता पाटील

 

१.
फुटले रस्ते...चालत गेले
हिरवेपण सांभाळत गेले

नजर तुझीही झुकली नाही
दुःखा..मी ओशाळत गेले

धीर कधीचा धरला होता
क्षण शेवटचा धावत गेले

तुला वाटली बडबड बहुधा
सगळे टाके उसवत गेले

पेल्यामधले वादळ नव्हते
पेल्यामध्ये बुडवत गेले

श्वास असाही चालत होता
मी पण सोबत चालत गेले

नजरांनीही जखमा झाल्या
शब्दांचे वळ निवळत गेले

वृत्ती नसते बदलत यांची
मलाच मी समजावत गेले

दुसरे काही नव्हते हाती
आयुष्याला उधळत गेले!

२.
प्रेमामध्ये पडतो आपण
स्वतः स्वतःला छळतो आपण

हव्यास असतो दुःखाचाही?
दुःखाने लाडवतो आपण

रितेपणाची दारू होते
तिचेच पेले भरतो आपण

डोंगरमाथा खुणवत असतो
त्या नंतर कोसळतो आपण

ओळख पटते या दुनियेची
कुठे स्वतःला कळतो आपण?

हयात जाते तहानलेली 
क्षण एखादा जगतो आपण

आत शांतता गळा घोटते
मोठ्याने ओरडतो आपण

आयुष्याची टाळी येते
अलगद त्याला फसतो आपण

अश्रुंना तर मिठीत घेतो
सुखास पण घाबरतो आपण

भीड ठेवतो जगण्याचीही
जगण्यासाठी झुरतो आपण
 
रात्र कोरडी ठणकत जाते
मग मैफल गाजवतो आपण

३.
काळ असा हा आला आहे दुनियेचा जर
जगून घेऊ फिकीर सोडुन निदान क्षणभर
 
उभारल्या बस भिंती आणिक दरवाजेही
सांग कसे पण म्हणायचे रे मी याला घर!

अशी हवा ही अन हा वारा स्वैर किती बघ
चंद्राच्याही ओठांची मग झाली थरथर

तुझा प्रश्न तो आवडलेला मला खरेतर
तरी घेतले आढेवेढे उगाच वरवर

नाजुक असते रात्र अशीही दोघांचीही
मानवायची कशी तिला रे इतकी साखर!

चहा घेतला जेवण केले आवरले घर
जाणवला मज इथे तिथे बघ तुझाच वावर

रंग तसा तर कायम नसतो डोळ्यांचाही
नकोच ठेवू उगा भरोसा या ओठांवर
........................................
 
योगिता पाटील

1 comment: