गझल गायकीचा इतिहास : डॉ.संगीता म्हसकर

१. गझलचा उगम
                        गझल गायकीचा स्वतंत्र असा इतिहास खरं तर फारसा उपलब्ध नाही.याचं कारण म्हणजे गझल चा उगम आणि विकास विविध गीत प्रकारांच्या प्रभावातून होत आलेला आहे.बाराव्या शतकात भारतात आलेल्या सूफी संतांनी इथे आल्यानंतर त्यांच्या प्रार्थना गाण्यासाठी भारतीय रागांचा उपयोग करण्याची सुरुवात केली होती.या प्रार्थनांना 'कौल' म्हणत. कालांतराने कौल पेश करणारे हे सूफी संत 'कव्वाल' या नावाने ओळखले जाऊ लागले.यातूनच पुढे दिल्लीत कव्वाल बच्चे परंपरेचा उदय झाला. मशिदीत वाद्य न्यायला परवानगी नसल्यामुळे कव्वालांच्या या संगीतात वाद्यांची साथ नसायची.यावर उपाय म्हणून अमीर खुसरो यांनी योग्य वजनाने हातावर ठेका आणि टाळी धरण्याची पध्दत रुढ केली. 'दस्तक -ए- बाउसूल' या नावाने आज देखील ही पद्धत प्रचलित आहे.कव्वाल गायकांकडून सादर केली जाणारी ही संगीत शैली पुढे कव्वाली या नावाने प्रसिद्ध झाली.या गायकांची या नंतर एक परंपरा च तयार झाली.ते व्यावसायिक गायक बनले.अर्थात लोकांच्या मनोरंजनासाठी जेव्हा त्यांनी कव्वाली सादर करायला सुरुवात केली तेव्हा मात्र त्यात धार्मिक विषयांच्या व्यतिरिक्त इतर विषयांचा देखील समावेश त्यांनी केला.साहजिकच प्रेम या विषयावर कव्वाली सादर होऊ लागली.हीच गझल गायकीची सुरुवात होती.थोडक्यात कव्वाली मधला इष्कीया रंग हीच गझल ची सुरुवात असं म्हणता येईल.म्हणजेच भारतात गझलचा प्रारंभ सूफी संतांनी केला आणि त्यावर गायकीचे संस्कार करुन ती विकसीत करण्यासाठी अमीर खुसरो यांनी प्रयत्न केले.  

२. गझल गायकीचा विकास
                        तेराव्या शतकात भारतीय संगीतात विलक्षण बदल घडत होते.सतत अस्थिर असलेल्या राजकीय परिस्थिती मुळे या काळात भारतीय संगीत 'उत्तर हिंदुस्थानी संगीत' आणि  'कर्नाटक संगीत' या दोन शैलीत विभागले गेले.उत्तर भारतातली संपूर्ण सत्ता अभारतीयांच्या हातात गेल्यामुळे संगीताचा मूळ उद्देशच बदलला. परमेश्वराची आराधना करणे हा भारतीय संगीताचा हेतू मागे पडला आणि बादशहाचे मनोरंजन करण्यासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला.अर्थात प्रचलित गीत शैली आणि रचना मागे पडल्या आणि नवीन रचना निर्माण झाल्या.
                शास्त्रीय संगीतात या काळात धृपद धमार गायकी लोकप्रिय होती.अमीर खुसरो आणि गोपाल नायक यांच्या योगदानातून ख्यालगायकी सुध्दा निर्माण झाली होती पण ती या काळात फार विकसित झाली नाही. अमीर खुसरो यांच्या लिखाणात त्या काळच्या गझल चा उल्लेख सापडतो.त्यांनी दरबारात गाण्यासाठी विकसित केलेल्या गझल गायकीवर शास्त्रीय संगीताचा प्रभाव होता.मात्र ही गायकी शास्त्रीय संगीतापेक्षा निकृष्ट दर्जाची मानली जायची.तवायफ गायिकांना ही गायकी शिकवली जायची.अमीर खुसरोंनी स्वता अनेक गझल लिहील्या होत्या ज्या आजही मैफिलीत लोकप्रिय आहेत.
  छाप तिलक सब छीन ली 
    मोसे नैना मिलायके..
                या सारख्या रचना त्या काळच्या गझल गायकीची झलक दाखवणार्या ठरतात. त्या काळापासून ते सुमारे अठराव्या शतकापर्यंत गझल दरबारात गायली जात होती.कव्वाली शैली पासून सुरू झालेल्या तिच्या स्वरुपात काळासोबत अनेक बदल घडत गेले.विविध शैलींची भर पडत गेली.परंतु अजूनही तिची ओळख तवायफ गायिकांची गायकी हीच होती.मुघल साम्राज्य संपल्यानंतर गझल चा राजाश्रय संपला आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी गझल नाईलाजाने दरबारातून कोठीवर पोचली. दरम्यानच्या काळात भारतीय संगीतात शब्द प्रधान संगीत आणि स्वरप्रधान संगीत असे दोन प्रकार ठळकपणे निर्माण झाले होते.शब्द आणि स्वर यांच्यात योग्य संतुलन साधणार-या रचना सर्व सामान्य रसिकांमध्ये लोकप्रिय होऊ लागल्या होत्या. तर शास्त्रीय संगीतात शब्दांचं महत्व कमी होऊन अनिबध्दतेचं आकर्षण कलावंतांना वाटायला लागलं होतं.ख्याल गायकीतला कल्पना विलास वाढीला लागला आणि बघता बघता ख्याल गायकी ने शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा ताबा घेतला. शास्त्रीय संगीताचा प्रभाव गझल वर सुरुवाती पासून होताच. नंतर च्या काळात प्रदेशानुसार देखील वेगवेगळे बदल गझल मध्ये घडत गेले.विशेषत: वेगवेगळ्या प्रदेशातल्या लोकसंगीताचा ऋतुगीतांचा विलक्षण प्रभाव गझल वर झाला.

 ३. ठुमरी दादरा गझल
                                        ठुमरी दादरा गझल हे तीन शब्द खूप वेळा एकत्र घेतले जातात इतके ते एकमेकांत एकरूप झाले आहेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने बघितलं तर ठुमरी चा उगम एकोणिसाव्या शतकातला! कव्वाल बच्चे परंपरेतले उस्ताद सादिक अली खाँ ठुमरी चे प्रवर्तक मानले जातात. मग या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की ठुमरी जर एकोणिसाव्या शतकात निर्माण झाली तर बाराव्या शतकात निर्माण झालेल्या गझल वर तिचा प्रभाव कसा? तर याचं उत्तर असं आहे की ठुमरी च्या उगमाबद्दल अनेक मतं मांडली गेली आहेत.खूप प्राचीन काळापासून तिची बिजं वेगवेगळ्या गीत प्रकारात दिसतात.अनेक लोकगीतांचा ऋतुगीतांचा प्रभाव ठुमरी दादरा होरी यावर दिसतो.थोडक्यात हा प्रभाव फार पूर्वीपासून गझल वर निर्माण झालेला होता.त्याअनुषंगाने कव्वाली पासून सुरू झालेल्या गझल ने शास्त्रीय संगीताबरोबर ठुमरी टप्पा अशा विविध शैलींना सामावून घेऊन स्वताची अशी समृद्ध शैली आज निर्माण केलेली दिसते. ठुमरी च्या प्रसिद्ध शैलींचा प्रभाव गझलवर दोन प्रकारे दिसतो.

अ. बनारस 
                बनारस शैलीची ठुमरी ख्यालाशी जवळिक साधणारी असते.संथ लयीत सादर होते.आलापीला प्राधान्य देते.ही ठुमरी प्रामुख्याने खमाज, मांड, पिलू अशा रागात गायली जाते. या ठुमरी चा प्रभाव असलेली गझल बेगम अख्तर गात असत.

ब.लखनवी ठुमरी
                द्रूत हरकतींनी सजलेली आणि नृत्य प्रधान अदाकारी व्यक्त करणारी ठुमरी म्हणजे लखनवी ठुमरी. या ठुमरी चा प्रभाव कथक साठी उपयुक्त ठरणा-या  नखरेल अशा गझलवर दिसतो. गझल ची एक पारंपरिक शैली दिल्ली ची शैली मानली जाते. दिल्ली ची गझल तिच्या मूळ शैलीत म्हणजे च कव्वाली शैलीत गायली जाते.काहीशा उंच स्वरात गायल्या जाणाऱ्या या गझलेत आर्त नाद जाणवतो.
        स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  गझलला संगीत क्षेत्रात खूप प्रतिष्ठा मिळाली. मानाचं स्थान लाभलं. चित्रपट संगीतात तर एकापेक्षा एक अशा लोकप्रिय गझल रचनांनी एक काळ विलक्षण गाजवला.बेगम अख्तर, गुलाम अली,मेहदी हसन यांच्या सारख्या अनेक कलाकारांनी गझलला उच्च  स्थान प्राप्त करून दिले. अशी ही गझल जणू रसिकांच्या काळजात कोरलेलं सुंदर शिल्प !
....................................................................................

डॉ.संगीता म्हसकर 


2 comments: