१.
केवढी चर्चेमधे ही वात असते
संपणारे तेल अंधारात असते
पेरताना शोधतो कोणास कुणबी
हात चाड्यावर नजर गगनात असते
ऊंच शिखरावर उद्या जाशीलही पण
आजची जागा खरी औकात असते
भरडते वेळी किड्यांना माफ करतिल
एवढी दानत कुठे जात्यात असते
जीव देणाऱ्या तुला माहीत नाही
केवढी गंमत इथे जगण्यात असते
कावळ्या हरखू नको,ती साद नाही
कोकिळा धुंदीत अपुल्या गात असते
बैल होउन राबते शिस्तीत दुनिया
कोणती वेसण तिच्या नाकात असते?
मरण जेंव्हा वेढते दाही दिशांनी
त्या लढ्याची नोंद इतिहासात असते
तुला मुबारक तुझी भरारी
अजून मजला जमीन प्यारी
तुला समजणे बरेच अवघड
कधी 'बला' तू,कधी 'बिचारी'
धडा दिला छान द्रोपदीने
असोत 'शंभर',नको जुगारी
जिथे वाजतो मधूर पावा
तिथे कशाला तुझी तुतारी
जरी तुझी शेपटी गळाली
तुला खेळवी नवा मदारी
तुझे मिरेचे हवेत डोळे
दिसेल सगळीकड़े मुरारी
मला मिळावी मनात जागा
नको जगाची जमीनदारी
किती दिले जीवना उसासे
तरी फिटेना तुझी उधारी
३.
आग पोटात पायामधे भिंगरी
सांग राधे कशी वाजवू बासरी
रोज येते नवी आस माजावरी
रोज आणू कशी मी नवी तरतरी
पारधी फास लावून दारावरी
हात खिडकीतुनी दावते सुंदरी
जगबुडी व्हायची वेळ आली तरी
खायला खीर सोकावल्या मांजरी
मी तिला साजरा ती मला साजरी
नांदतो मी सुखे......वेदनेच्या घरी
वाट लावून गेलाय कोणीतरी
या जगाला तरी वाटते मस्करी
...............................................
आत्माराम जाधव
छानच गझला
ReplyDeleteपेरताना शोधतो कोणास कुणबी...
मस्त
अजून मजला जमीन प्यारी ...