दोन गझला : गाथा जाधव-आयगोळे



१.
 
जो जसा दिसतो तसा केव्हाच नसतो
आरसाही नेमका इकडेच फसतो

रोज खरचटते मनाला पण तरीही..
धावण्याचा वेग त्याचा तोच असतो

शब्द म्हणजे मेळ नुसता अक्षरांचा..
काळजाला भेदुनी तर अर्थ घुसतो

आत्महत्येमागचे इतकेच कारण...
बेत जगण्याचाच वारंवार फसतो

पायरी राखून तोवर बोलते मी..
बोलणारा जोवरी राखून असतो

श्वासही मोजून नशिबाने दिलेले...
सोडल्यावर एक मग दुसरा गवसतो

 
२.

कोंडली देहातल्या कप्प्यात आहे..
एक वेडी बाहुली माझ्यात आहे

शल्य एखादे हवे कायमस्वरूपी..
श्वास घेण्याची मजा त्याच्यात आहे

का तरीही हाव इतकी जन्म करतो...
हाच साला मृत्युच्या कह्यात आहे

परवडत गरिबास नाही चैन म्हणुनी..
कोर भाकर तान्हुल्या डोळ्यांत आहे

टांगल्या गेल्या हयाती कैक असल्या..
फक्त श्रीमंतीच पण मथळ्यात आहे

बोल माझे कोरले जाणार नक्की...
एरवी 'गाथा' जमा नसल्यात आहे
......................................

गाथा जाधव-आयगोळे.


1 comment: