तीन गझला : निर्मिती कोलते



१.
ह्या उन्हावर मात केली पाहिजे 
सावली आयात केली पाहिजे 

पाहुणा आहे घरी अंधार जर 
मंद थोडी वात केली पाहिजे 

दोन ओळींचा नको संवाद हा 
पानभर सुरुवात केली पाहिजे 

चूक आहे वाटते दुनियेस जी 
चूक ती अर्थात केली पाहिजे 

मावळू दे सूर्य मग भेटू म्हणे 
ह्या उन्हाशी बात केली पाहिजे 

देव नसल्याची खुली चर्चा इथे 
देवळाच्या आत केली पाहिजे 

ठेवली अर्धी तुझ्यावरची गजल
पूर्ण या जन्मात केली पाहिजे

२.
तुझा पत्ता विसरण्याची 
गरज आहे हरवण्याची 

कुठे आले अजुन स्टेशन 
किती घाई उतरण्याची 

उतारावर सख्याचे घर 
मला भीती घसरण्याची 

नवी ही खोड आजीची 
जुन्या पेट्या उघडण्याची 

तुला कुठले नको बंधन 
तिची इच्छा अडकण्याची 

घड्याळाला दिली शिक्षा 
पुढे काटे ढकलण्याची  

चुलीला काळजी नसते 
कधी पोळी  करपण्याची 

३.
इथे कृष्णा तुझी माझी कहाणी राहिली नाही
सख्या आता तुझी राधा दिवाणी राहिली नाही

तिला स्वप्नातही कळते तुझ्या श्र्वासातली थरथर
तुला ती वाटते तितकी अडाणी राहिली नाही 

तिने केला गिलावा बघ नवी ही रंगरंगोटी
तिथे आता तुझी कुठली निशाणी राहिली नाही

किती वेगात पोरांचे बदलले खेळ हे सारे
फुगे कंचे लगोरी अन पिपाणी राहिली नाही

न आता जीव तडफडतो कुणाच्या दूर जाण्याने
अशी ओठात रुतणारी विराणी राहिली नाही

कशी फुलपाखराच्याही खुणेला भाळते वेडी
कळी बागेतली आता शहाणी राहिली नाही

समजते खंत सुकलेल्या तुझ्या डोळ्यातली आजी
इथे ती ओल नात्यांची पुराणी राहिली नाही 

...............................................

निर्मिती कोलते,
पुणे


1 comment: