दोन गझला : सुप्रिया जाधव



१.
जरा जखमेवरी ह्या घाल फुंकर... फार नाही !
तुझ्या-माझ्यात जे पडलेय अंतर... फार नाही

क्षणांचे तास झाले आणि तासांचीच वर्षे
तुझ्या विरहामधे झाले युगांतर ...फार नाही ?

अबोल्यावर कशाला फोडणी ही टोमण्यांची ?
चिमुटभर पेर संवादात साखर... फार नाही !

मिळव येत्या क्षणामध्ये मिळवणे शक्य ते ते
क्षणामध्ये बदलतो काळ, अवसर फार नाही

तुझ्या चिंतेत ती गढली, अकाली पोक्त झाली
तिला बालीश म्हणणे हे तुझे वर...फार नाही ?

तुझ्या चांगुलपणाबद्दल नव्याने काय बोलू ?
जरासा दे मलाही वाटला तर...फार नाही !

कधी माहेर तर सासर, सदा आहेच मरमर !
स्वतःसाठी जगूया का घडीभर ?... फार नाही !


२.
तुझ्या निवाड्यावरीच अवघी मदार आहे
कबूलनामा लिहून माझा तयार आहे

मनात माझ्या कुठून त्याचा विचार येतो ? 
अभेद्य किल्ल्यामधे कदाचित भुयार आहे

बदाम राजा, बदाम राणी, गुलाम हाती      
तरी अडवणे बदाम अठ्ठी, जुगार आहे

बघेल तेव्हा उगाच कुलटा तिला ठरवणे 
सुशील मित्रा,असाध्यसा हा विकार आहे

मला विसरणे तुला कदापी अशक्य नाही    
कधीतरी ओघळेल अश्रू,  चुकार आहे !

विचार त्याचा मनात येतो, सुरेख दिसते 
कबूल करते दिसायला मी सुमार आहे

कधीतरी पाय घाल तूही  बुटात माझ्या  
कळेल तेव्हा खरा कसा हा प्रकार आहे  
........................................................
  
सुप्रिया मिलिंद जाधव

No comments:

Post a Comment