१.
चांदण्यांची रात्र तू अन् पोर्णिमेचा चांदवा
दाट अंधाऱ्या धुक्यातिल तू चमकता काजवा
तू उषेची लालिमा अन् तू धरेची रक्तिमा
सांजसमयी छेडलेला तू सुरीला मारवा
पावसाची सर उन्हाळी तू हवा रानातली
पावसाळी स्पर्श ओला तू हवासा गारवा
धुंद पक्षांचा थवा तू गूढ गगनाची निळाई
माळरानी बहरलेला तू फुलांचा ताटवा
इंद्रधनुचे रंग तू अन् तू चमकती वीज ती
सागराची लाट तू अन् तू मधाचा गोडवा
२.
तुला कसे हे लिलया जमते कमाल आहे
बोट उचलता दुनिया झुकते कमाल आहे
सोने सुध्दा घेतच नाही कोणी माझे
तुझी कशी मग माती विकते कमाल आहे
कष्ट करूनी पोट खपाटी गेले माझे
तुझी बसूनी ढेरी सुटते कमाल आहे
मरेस्तोवरी राब राबतो शेतकरी हा
आणि तिजोरी त्यांची भरते कमाल आहे
घरी बसूनी यांचा नेता आग लावतो
आणिक वस्ती त्यांची जळते कमाल आहे
गांधीवादी निघतो मोर्चा तरी भयाने
लाठी उठते डोके फुटते कमाल आहे
दुनियेचे या रूप कळेना नक्की कुठले
बघता बघता रंग बदलते कमाल आहे
...................................
वसंत शिंदे ,
सातारा.
No comments:
Post a Comment