तीन गझला : डॉ. अमिता गोसावी


 
१.

खयालांना उतरण्याला खुले बंदर हवे आहे
जुन्या बंदिस्त स्वप्नांना नवे अंबर हवे आहे

सरळ रेषेत जगण्याने झरा कंटाळुनी गेला
प्रवाहाला वळण त्याच्या सखल खडतर हवे आहे

खरे उत्तर मिळवण्याला भटकले प्रश्न अन् थकले
कशाला शेवटी त्यांना अचुक  उत्तर हवे आहे

जरी प्रेमात पडल्यावर बिलगले ध्यास दोघांचे
तरी श्वासास दोघांच्या तरल अंतर हवे आहे

सुगंधाच्या उपेक्षेने तगर वैतागली झुरली
तिला ग॔धीत करणारे नवे अत्तर हवे आहे

२.

लिहुनी अनंत ओळी थकली अपार शाई
साकारलीच नाही शब्दामधून आई

विसरून वाद सारे भेटू जुन्या ठिकाणी
होतील स्तब्ध कोकिळ लाजेल आमराई

मौनात दुःख कुढते रडते निषेध करते
शेरात व्यक्त होण्या करते लगेच घाई

जन्मायला हवा जर शतकात या शिवाजी
घडवायला हवी ना आधी नवी जिजाई

 बेछूट मागण्यांची करतात भक्त यादी
कंटाळली असावी ऐकून ती विठाई

गेला निघून वारा परक्या जगात रमला
गंधाळलीच नाही नंतर उदास जाई

घरदार सावराया झिजते बरोबरीने
वर्चस्व मान्य पुरुषी करते कशास बाई

३.
 
लेक बायको आई आजी असे तिचे नामांतर झाले
बंधनातले धागे बदलत फक्त तिचे कोषांतर झाले

व्यथा वेदना दुःख यातना वेगवेगळे अनुभव होते 
अनुभवांचे तरी त्या सगळ्या अश्रूतच भाषांतर झाले

चक्र बांधलेले पायांना धावपळीतच जीवन सरले 
हुश्श्य म्हणायासाठी सुद्धा कधीच ना मध्यांतर झाले

वेष  बदलुनी त-हेत-हेचे कंटाळत तो आत्मा नव्हता
अजूनही का त्याला नाही नको नको वेषांतर झाले

वाद रंगला विरोधकांचा पराजयाच्या मुद्द्यांवरती
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकमते विषयांतर झाले
............................................

डाॅ अमिता गोसावी

2 comments:

  1. खूप छान

    स्त्री पुरुष समानता व्यक्त करणारा शेर भावला

    बेछूट मागण्याला मागण्याला विठाई कंटाळली👌

    ReplyDelete